मुंबई : अनलॉकच्या प्रक्रियेत काही मोठ्या समारंभांना शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात नियम व अटींची बंधने घालण्यात आली आहेत. लग्नाच्या बाबतीतदेखील काही असेच झाले आहे. लग्न समारंभात केवळ ५० जणांची उपस्थिती असावी लागणार आहे. त्यात ज्या मंगल कार्यालयावर लग्न सोहळा होणार आहे. त्याचा अर्ज, पोलिसांची परवानगी, पालिकेची परवानगी या सर्व प्रक्रियांमुळे यजमानांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे. अनेकांना ही प्रक्रिया अत्यंत किचकट वाटत असल्याने त्यांच्यासमोर लग्न नेमके करायचे तरी कसे, असा प्रश्न पडत आहे. मंगल कार्यालयांमध्ये उपस्थित असणाऱ्या ५० जणांमध्ये आचारी, भटजी इत्यादींचा समावेश असल्याने लग्नाला नक्की कोणत्या नातेवाइकांना बोलवायचे, असादेखील प्रश्न यजमानांना पडत आहे. लग्न समारंभात वाजणारे डीजे व बँडबाजा यासाठी पोलीस ठाण्यातून विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र कोरोनामुळे डीजे व बँडबाजा यांवर शासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यामधून त्याला परवानगी मिळत नाही. लग्नासाठी अटी कोणत्या?ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणच्या जागेचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे, केवळ ५० जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडणे, उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क व एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जावे, डीजे व बँड बाजा यांच्यावर संपूर्णपणे बंदी आणि मंगल कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवणे.परवानगीसाठी करावी लागणारी कसरत पाहता. आम्ही लग्न घरातल्या घरात साध्या पद्धतीने उरकून घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून शासनाच्या नियमांचे आदरपूर्वक पालन करायला हवे. - दत्तात्रय पाटील, वधुपितालग्नकार्यात केवळ ५० जणांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यात परवानगी देखील सहजासहजी मिळत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तविली गेली आहे. यामुळे लग्न पुढे ढकलावे की कोर्टात साध्या पद्धतीने उरकून घ्यावे, अशा मनस्थितीत कुटुंबीय आहेत.- जयेंद्र धुमाळ, वरपितालग्नाची परवानगी घेण्यासाठी कसरत मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन प्रभाग कार्यालयात जावे लागते. वधू-वराचे दाखले व पुरावे तसेच लग्नाला उपस्थित राहणाऱ्या ५० जणांची नावे द्यावी लागतात. या कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांची प्रत पोलीस ठाण्यात जमा करावी लागते. यानंतर पोलीस ठाण्याची नाहरकत मिळाल्यावर पालिकेकडून परवानगी देण्यात येते.
सावधान! लग्न करत आहात, मग याची तयारी ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:03 AM