Join us

लाचखोर पोलीस निरीक्षक गजाआड

By admin | Published: October 09, 2015 3:29 AM

टेबल जामीन देण्यासाठी हॉटेल मालकाकडून २५ हजारांची लाच घेताना मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी आणि मध्यस्थी करणारा मनोहर भंडारी याला एसीबीने

मुंबई : टेबल जामीन देण्यासाठी हॉटेल मालकाकडून २५ हजारांची लाच घेताना मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी आणि मध्यस्थी करणारा मनोहर भंडारी याला एसीबीने सापळा रचून अटक केली. दळवींच्या झडतीमध्ये पोलीस ठाण्यातील लॉकरमधून ४ लाख ९० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.मालाड येथील ललित विहार लंच होम अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर छापा टाकून तेथील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये जामीन देण्यासाठी दळवीने हॉटेल मालकाकडे २५ हजारांची मागणी केली होती. या प्रकरणी हॉटेल मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दळवींनी हॉटेल मालकाला पैसे घेऊन पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस ठाण्यात दळवींमार्फत पैसे घेत असलेल्या भंडारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. पोलीस ठाण्यात केलेल्या झडतीत दळवीच्या लॉकरमधून तब्बल ४ लाख ९० हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. दळवी यांचे कांदिवली परिसरातील ठाकूर संकुल परिसरात दोन फ्लॅट असून या प्रकरणीही अधिक तपास सुरू आहे. हे दोन्ही फ्लॅट दळवी यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. या बेहिशेबी मालमत्तेबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)