लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा व भाजपचे अन्य नेते सतत काही ना काही कारण देऊन न्यायालयात उपस्थित राहणे टाळत असल्याने आरोप निश्चित करता येत नसल्याचे सांगत विशेष न्यायालयाने नाराजी दर्शविली. हे लोक किती दिवसांपासून गैरगजर आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का, निवडणुकीसाठी गुजरातला जाणे हे कार्यालयीन काम आहे का, अशी विचारणा विशेष न्यायालयाने त्यांच्या वकिलांकडे केली.
शुक्रवारच्या सुनावणीत २० पैकी ११ आरोपी गैरहजर राहिले. त्यात लोढा व नार्वेकर यांचा समावेश होता. त्यांचे वकील मनोज गुप्ता यांनी न्यायालयाला सांगितले की, गुजरात निवडणूक असल्याने सर्व जण तेथे गेले आहेत. या खटल्यात आरोप निश्चित करायचे असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. ते पुढील सुनावणीस हजर राहतील. त्यावर विशेष न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे म्हणाले की, त्यांच्या अनुपस्थितिबाबत रोजनामामध्ये जे म्हटले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. त्यावर गुप्ता यांनी आरोपी पुढील सुनावणीस हजर राहतील, असे न्यायालयाला पुन्हा एकदा सांगितले.
गुप्ता यांनी ११ आरोपींसाठी खटल्यावरील सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा मिळावी यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. सर्व आरोपी गुजरातला निवडणूक प्रचारासाठी गेल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. ते गुजरातला निवडणुकीसाठी गेले, हे कारण योग्य वाटते का, हे कार्यालयीन काम नाही. ते ज्या कार्यालयीन कामासाठी गेले आहेत, ते नमूद करा, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी २ डिसेंबर रोजी ठेवली आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात बेस्टने विजेचे दर वाढवल्याने बेस्ट कार्यालयात बेकायदेशीरपणे केलेल्या आंदाेलनाप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोप निश्चित करण्यात अडचणीपोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आरोपींच्या अनुपस्थितीमुळे आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. नार्वेकर व लोढा यापूर्वी खटल्याच्या काही तारखांना सुनावणीस उपस्थित होते. ९ जुलै २०२१ रोजी सर्व २० आरोपी न्यायालयात हजर होते.