Join us

गुजरात सरकार, गुजराती नागरिकांनाच राज्यात घेईना, बाळासाहेबांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 10:24 AM

राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी

मुंबई - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, गुजरातच सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नसल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.  

राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. नाशिक, अहमदनगर, मुंबई , नागपूर येथून काही ट्रेनही परराज्यात रवाना झाल्या आहेत. तर, काही मजूर बसमधून रवाना होत आहेत. 

परराज्यात अडकलेल्या मजूरांना गावी पोहोचविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी, संबंधित राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. ज्या राज्यात मजूरांना जायचं आहे. त्या राज्यातील सरकारने एनओसी देऊन या मजूर आणि स्थलांतरीत नागरिकांना आपलंस करणे आवश्यक आहे. मात्र, गुजरात सरकार, मुंबईसह महाराष्ट्राती विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना राज्यात घेत नाही, असा आरोपच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. थोरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधींना मेन्शन केले आहे. 

प्रवासी मजूरांचा प्रश्न गंभीर बनला असून काँग्रेसकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांचा खर्च उचलण्यात येत आहे. मात्र, तरीही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्विकारण्यास तयार नाही, हे दुर्दैवी आहे. गुजरात सरकारने मुंबईतून सम्खियाली (कच्छ) येथे जाऊ इच्छित असलेल्या १२०० गुजराती नागरिकांना अद्याप परवानगी दिली नाही. त्यासोबतच, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यातीही मजूरांना स्विकारण्यात येत नाही, अशी चिंता बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :मुंबईगुजरातस्थलांतरणबाळासाहेब थोरातविजय रूपाणी