मुंबई- माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात औद्योगिक गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर होता. गुजरातला आम्ही मागे ठेवले, याचा मला आनंदच आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच वेदांता गुजरातमध्ये गेला, म्हणजे तो पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना करून दिली आहे.
गेल्या अडीच वर्षातील नाकर्तेपणा, घोटाळे आणि नकारात्मकता यामुळे महाराष्ट्र माघारला, अशी टीका करताना येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लघु उद्योग भारतीय संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला न्यायचा हे त्यांचे आधीच ठरले होते. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच त्यांचा निर्णय झाला होता. आम्ही आल्यानंतर हा प्रकल्प आपल्या राज्यातून जाऊ नये, यासाठी निकराची शर्थ केली. ज्यांनी काहीच केले नाही, ते आता आमच्याविरोधात बोलत आहेत आणि आमच्याकडे बोटे दाखवत आहेत. आम्हाला शहाणपणा शिकवतायत. तुमचे कर्तृत्व तुम्ही सांगा. तुम्ही काहीच केले नाही. तुमच्या काळात महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे पडले असेल. मात्र, पुढच्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेले नाही, तर बघाच, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, वेदांता आणि फॉक्सकॉनचा कल हा गुजरातकडे दिसतोय, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. अनिल अग्रवाल यांच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. लगेचच मी त्यांना फोन लावला. तुम्ही हा प्रकल्प गुजरातला का नेत आहात, याबाबत चर्चा केली. गुजरात जे जे देत आहे, तेच आम्हीही देऊ. किंबहुना त्यापेक्षा अधिक द्यायला तयार आहोत, अशी चर्चाही झाली. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांना पत्र दिले. मी स्वतः अनिल अग्रवाल यांच्या घरी गेलो. मात्र, गुजरातमध्ये जाण्यासंदर्भात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहोत. मात्र, आमचा कल महाराष्ट्राकडेही आहे. निश्चितच आगामी काळात आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू, असे आश्वासन त्यांनी मला त्यावेळी दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.