मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात लेवा पाटीदार समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून पाटीदार क्रांती दलाने सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. एका महिन्यात मुख्यमंत्री व भाजपा सरकारने पाटीदार समाजाला मंत्रिपद दिले नाही, तर आगामी निवडणुकांत गुजरात विधानसभा निवडणुकांची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दलाचे संयोजक सुहास बोंडे यांनी दिला आहे.बोंडे म्हणाले, पाटीदार समाजाविरोधात भाजपाच्या मनात द्वेष असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. या समाजातून महाराष्ट्र विधानसभेवर तीन आमदार निवडून गेलेले आहेत. ते तीनही आमदार भाजपाचे आहेत. पैकी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र, त्यांच्या गळ्यात इतर मंत्रिपदे मारली. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले. खडसे यांना मंत्रिपदावर घ्यावे किंवा आमदार हरिभाऊ जावळे आणि सुरेश भोळे या पाटीदार समाजाच्या आमदारांना संधी देण्याची मागणी बोंडे यांनी केली.नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकीत पाटीदार समाजाच्या रोषाचा परिणाम भाजपा सरकारने अनुभवला आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल, तर येत्या महिन्याभरात पाटीदार समाजाला मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आवाहन पाटीदार क्रांती दलाने केले आहे. नाही तर एका महिन्यानंतर रस्त्यावर उतरून पाटीदार समाज आपला रोष व्यक्त करेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
...तर महाराष्ट्रातही गुजरातची पुनरावृत्ती! पाटीदार समाजाचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:30 AM