Join us

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

By मनीषा म्हात्रे | Published: November 03, 2023 5:29 PM

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई : अल्पवयीन मुलांच्या मदतीने घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या गुजरात मधील महिला टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेखा सतीश राठोड (३५),  निली दिपू पवार (३०) आणि मनीषा दीपु पवार (२०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहे.

दादर परिसरात राहणाऱ्या संजीव विनोद चंद्र पारेख (६२) यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४७ ते ११.५२ च्या दरम्यान ही घटना घडली. २ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलांच्या त्रिकुटाने अवघ्या पाच मिनिटात कार्यालयात घुसून मोबाईल, आणि पैसे चोरून पळ काढला. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

माटुंगा पोलीस ठाणे परिसरात गेल्या दोन दिवसापासून घरामध्ये घुसून काही महिला व मुली चोरी करत असल्याचे व्हाट्सअप ग्रुप वर माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांना अलर्ट देण्यात आला. त्यानुसार, संशयास्पद फिरणाऱ्या  तीन महिला व तीन मुलीस ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या चौकशीत त्या चोरीच्या उद्देशाने मुंबईत आल्याचे स्पष्ट झाले. अटक त्रिकुटाने आर ए  के पोलीस ठाणे, नेहरूनगर पोलीस ठाणे परिसरात देखील चोरी केल्याचे स्पष्ट झाले.  त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात चोरी केलेले ६ मोबाईल आणि दोन हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :मुंबईअटकमहिला