राज्यपाल अभिभाषणाचा मराठीऐवजी गुजराती अनुवाद; विरोधक संतापले, मुख्यमंत्र्यांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 01:30 PM2018-02-26T13:30:45+5:302018-02-26T13:30:45+5:30
सरकारने आज मराठी भाषेचा खून केला.
मुंबई: राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी वादळी सुरुवात झाली. यावेळी सभागृहात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न झाल्यामुळे विरोधकांनी सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. कहर म्हणजे अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेत ऐकू येत होते. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून या प्रकाराबद्दल सरकारकडून सभागृहाची माफी मागितली. राज्यपालांच्या अभिभाषण मराठीत अनुवाद करणारी व्यक्ती भाषांतर कक्षेत नसल्याने हा प्रकार घडला. तसेच या प्रकरणी दोषींवर संध्याकाळपर्यंत कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.
आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही ओळी मराठीत बोलल्यानंतर राज्यपालांनी इंग्रजीत भाषण करायला सुरुवात केली. यावेळी सरकारी अनुवादकांकडून या भाषणाचा अनुवाद केले जाणे अपेक्षित होते. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या भाषणाचा अनुवाद केला. मात्र, तावडेंची ही कृती म्हणजे मंत्र्यांनी विधिमंडळाच्या अखत्यारितील कामकाजावर केलेले अतिक्रमण असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही सरकारने इतका गलथान कारभार केला नव्हता. विनोद तावडे यांनी भाषणाचा अनुवाद करण्यापूर्वी सभापती आणि विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली होती का, असा सवाल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारने आज मराठी भाषेचा खून केल्याची जळजळीत टीका केली.