मुंबई: गुजरात राज्याच्या गावाने महाराष्ट्रातील गावात अतिक्रमण केलंय, असा आरोप डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केला. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागावरुन वाद सुरु असताना आता महाराष्ट्र आणि गुजरात सीमाभागचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वेवजी, गिरगाव, घिमानिया, झाई, सांभा आणि आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. गुजरात राज्यातील उमरगाव तालुक्यातील गोवाडे, सूलसुंभा, सध्या, उमरगाव तालुक्यातील सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायतमध्ये जवळ जवळ ५०० मीटर जागेवर अतिक्रमण केल्याची माहिती विनोद निकोले यांनी सभागृहात दिली.
विनोद निकोले यांच्या माहितीवरुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढील आठवड्यात हा वाद सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई येथील स्थानिक प्रश्नांसोबतच वेवजी (ता. तलासरी) व सोलसुंभा (जि. बलसाड) यांच्या सीमाहद्दी निश्चितीसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, गुजरातने महाराष्ट्राच्या जमीनीवर अतिक्रमण केल्यानं जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्र राज्यातील एका गावामध्ये गुजरात राज्याने अतिक्रमण करणं हे बघायला गेलं तर खुप लहान प्रकरण आहे. पण भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे प्रकरण खुप मोठं आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा हा अपमान आहे. एक इंचही जमीन सोडणं म्हणजे १०५ हुतातम्यांच होतात्म्य विसरण्यासारखं आहे. अनेकांनी हा प्रश्न हसण्यावरी नेला. पण आजचा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राच्या सीमा रक्तानी माखलेल्या आहेत. ते रक्त इथल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या अनेक लढवय्यांचे आहे. आज जेव्हा गुजरातला एक इंच जमीन जाते तेव्हा त्या लढवय्यांच्या रक्ताचा अपमान होतो हे लक्षात ठेवा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.