Join us  

"गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ करणार घातपात", मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:26 PM

धमकी देणाऱ्या व्यक्तीने गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ हा मुंबईत घातपात करणार असल्याचे फोनद्वारे सांगितले आहे.

मुंबई :  मुंबई पोलिसांना (Mumbai Police) फोनद्वारे धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबईत घातपात करण्यात येणार असल्याचा धमकीवजा फोन आला. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ हा मुंबईत घातपात करणार असल्याचे फोनद्वारे सांगितले आहे.

मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीद्वारे हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. यावेळी कक्षात उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आणि आसिफ नावाचा काश्मीरचा व्यक्ती मुंबईत मोठा कांड करणार आहेत, असा फोन करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे. तसेच, घातपात घडवणारे समा आणि आसिफचे हे एकमेकांच्या संपर्कात असून त्याचे फोन नंबर देखील पोलिसांना देण्यात आल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सध्या सर्व यंत्रणांना अलर्ट केले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा असे फेक कॉल येत असतात. यापूर्वी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण होत आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, या घटनेला १५ वर्ष पूर्ण होत असताना मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारीमुंबई