Join us

गुजरात संघाचा दबदबा कायम, सलग आठव्यांदा मिळवले जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:33 AM

दृष्टिहीन राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखताना गुजरात संघाने सलग आठव्यांदा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला.

मुंबई : दृष्टिहीन राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखताना गुजरात संघाने सलग आठव्यांदा विजेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी मध्य प्रदेशचा ९ बळींनी धुव्वा उडवत दिमाखात बाजी मारली.दी ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन आणि दी रोटरी क्लब आॅफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेचे सामने इस्लाम जिमखाना आणि सचिवालय जिमखाना येथे पार पडले. अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु बलाढ्य गुजरातने भेदक मारा करताना ७ षटकांत मध्य प्रदेशला अवघ्या ३४ धावांमध्ये गुंडाळले. येथे त्यांनी आपले जेतेपद निश्चित केले.यानंतर माफक धावसंख्येचा पाठलाग करताना केवळ २ षटकांमध्ये गुजरातने एक फलंदाज गमावत विजयी लक्ष्य गाठले; आणि सलग आठव्यांदा राष्ट्रीय विजेतेपदास गवसणी घातली. खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते विजयी गुजरात संघाला २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचवेळी उपविजेत्या मध्य प्रदेशला १५ हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. या वेळी सावंत यांनी दृष्टिहीन व्यक्तींच्या प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनेकरिता एक लाख रुपये रोख रक्कम देण्याची घोषणाही केली.स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने छाप पाडलेल्या गुजरातच्या केतन पटेल याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्याने संपूर्ण स्पर्धेत २३२ धावा काढताना ३ बळीही मिळवले. तसेच, अर्ध दृष्टिहीन खेळाडूंमध्ये दिल्लीच्या पिंटो साहाला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. पिंटोने १२६ धावा काढताना ४ बळी मिळवले.