मुंबई-
राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या आणि सध्या शिंदे गटात असलेल्या गुलाबराव पाटील यांनीही आपल्या सडेतोड शैलीत भाषण केलं. यावेळी गेल्या अडीच वर्षातील खदखद गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली आणि संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.
"आम्ही बंड केलेलं नाही आम्ही उठाव केला आहे. आम्ही आजही शिवसैनिक आहोत. आजूबाजूच्या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. जे आमच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आमची लायकी काढली. चार मतं घ्यायची ज्यांची लायकी नाही ते आम्हाला डुक्कर म्हणून लागले", असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.
"मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर द्याल असं आम्हाला म्हटलं जातंय. पण मी सांगू इच्छितो आम्ही ३०-३५ वर्ष शिवसेनेसाठी झटून आमदार झालेलो आहोत. इतकी वर्ष शिवसेनेत काम केलं. त्याची आम्हाला ही बक्षिसी मिळत आहे का? आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलो हे आमचं आम्हाला माहित आहे. त्यामुळे आमच्या मतांवर निवडून येणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये", असा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना लगावला.
आदित्य ठाकरेंवर निशाणा"आदित्य ठाकरे महाराष्ट्रात किती फिरले ते पाहा. त्यांचे दौरे काढा. सर्व रेकॉर्डवर आहे. पण एकटे शिंदे साहेब फिरले. माझ्या मतदार संघात पाचवेळा आले. शरद पवारांसारखा ८० वर्षाचा माणूस जळगावात तीन वेळा आला. टोपे आले, मुंडे आले, अजितदादा आले. जयंत पाटीलही आहे. तुम्ही का नाही आले?", असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला.
"डोळ्याला डोळा भिडवा म्हणता आमचा डोळा मिळाला शिंदे साहेबांशी. आमचा डोळाला मिळाला फडणवीसांशी आणि लक्षात आलं की, जबसे तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई, मुश्किल बहोत थी, जिंदगी आसान हो गई, बेहद करीब होने का हमें ये फायदा हो गया की, मतलब परस्त लोगों की पहेचान हो गई", अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.