दावे-प्रतिदावे आणि विजयाचा गुलाल, ग्रामपंचायत निकालानंतर श्रेयवादाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:23 AM2022-09-20T06:23:59+5:302022-09-20T06:26:17+5:30
अहमदनगर, नाशिक-पुण्यात राष्ट्रवादीचा दबदबा कायम, नंदुरबार जिल्ह्यावर भाजपचा विजयाचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/नाशिक : जिल्ह्यातील ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. ११ ठिकाणी शिवसेना व संमिश्र सत्ता आली असून भाजपला केवळ ४ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. बाजुच्या अहमदनगर जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. भाजपने १२ तर अपक्षांनी तीन ग्रामपंचायती जिंकल्या.
सातारा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींवर आमदार गटांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामध्ये खेड, गोजेगाव ग्रामपंचायत आमदार महेश शिंदे, चिंचनेर निंब आणि खिंडवाडी ग्रामपंचायत आमदार शशिकांत शिंदे उपळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तर संभाजीनगर ग्रामपंचायतीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचारांची सत्ता आली. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ गटाने बाजी मारली. नाशिक जिल्ह्यातील नाशिकसह कळवण, दिंडोरी या तीन तालुक्यांतील ८२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून, काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाची मतदारांनी पाठराखण केली आहे. नंदुरबार जिल्ह्यावर भाजपचा विजयाचा दावा.
राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले, तर सोमवारी त्यांचा निकाल जाहीर झाला. तसेच ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पक्षचिन्हांवर या निवडणुका झाल्या नसल्या तरी भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपापले बालेकिल्ले शाबूत राखण्यात यश मिळविले आहे. तुलनेत शिवसेनेच्या ठाकरे गटाला ग्रामीण भागात जनाधार मिळाला नसल्याचे चित्र या निकालातून दिसून आले.
नंदुरबार : जिल्ह्यातील १४९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपने सर्वाधिक म्हणजे ९२ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसनेही अनेक ग्रामपंचायतींवर विजयाचे दावे केले आहे. १४९ पैकी १२ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. निवडणूक झालेल्या १३७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने सर्वाधिक म्हणजे, ९२ सरपंच आपल्या पक्षाचे विजयी झाल्याचा दावा केला आहे, तर शिवसेना (शिंदे गट)ने ३३ सरपंच आपल्या पक्षाचे असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने शहादा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादीचाही सात ग्रामपंचायतींवर दावा आहे.
नांदेड, हिंगोलीत संमिश्र कल
नांदेड : जिल्ह्यात सोमवारी ८१ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या पक्षांना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षांकडून आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. किनवट तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी एका ठिकाणी बहिष्कार टाकला होता. दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली. माहूर तालुक्यात २२ ठिकाणी मतदान झाले. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते.
हिंगोलीत सहा ग्रामपंचायतींपैकी
२ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे, १ शिवसेना ठाकरे गट, तर १ राष्ट्रवादीकडे गेल्याचा दावा केला जात आहे.
अमरावतीत काँग्रेसचे वर्चस्व
अमरावती : जिल्ह्यातील सातपैकी तीन ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस व दोनमध्ये भाजपने बाजी मारली. दोन ठिकाणी स्थानिक आघाडी भारी पडली. रोहणखेड ग्रामपंचायत अविरोध निवडून आली. तिवसा तालुक्यातील आखतवाडा येथे ओबीसीकरिता असलेले थेट सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त राहिले. उर्वरित सहा सदस्यपदे अविरोध झाली. तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्यातील पाच थेट सरपंच झाले.
अकोल्यात स्थानिक आघाड्या
अकोला : जिल्ह्यात व्याळा ग्रामपंचायतीत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या गटाचे प्राबल्य दिसून आले. अकोट तालुक्यातील पोपटखेड येथे स्थानिक आघाडी, गुल्लरघाट येथे सरपंचपदी बच्चू कडूंच्या प्रहार समर्थीत पॅनल विजयी झाले. शिवपूर कासोद गट ग्रामपंचायत, धारगड ग्रामपंचायत, धारूळ रामापूर गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अपक्ष विजयी झाले. धारूळ रामापूरवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला.
यवतमाळमध्ये काँग्रेसचे वर्चस्व
यवतमाळ : ७० ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या. काँग्रेसने सर्वाधिक ३४ तर २३ ग्रामपंचायतींमध्ये भाजप विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाच ग्रामपंचायती जिंकल्या असून, शिवसेना आणि शिंदे गटाकडे प्रत्येकी एक, तर सात ग्रामपंचायतींमध्ये इतर पक्ष तसेच स्थानिक आघाड्या जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.
वाशिममध्ये प्रस्थापितांना नाकारले
वाशिम : वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील काजळेश्वर, धनज, वाई व किन्ही रोकडे या चारही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापितांचा नाकारत नव्या उमेदवारांना संधी दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सातपैकी पाच ग्रामपंचायतींवर कुठल्याही पक्षाने दावा केलेला नाही. संग्रामपूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.
परभणीत संमिश्र कौल
परभणी : जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार
थेट सरपंच झाला. यासह काँग्रेस ७, भाजपचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेले उमेदवार विजयी झाले. पालम तालुक्यातील उमरथडीमध्ये आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला. या गटाने ७ पैकी ५ ग्रामपंचायतीच्या जागा जिंकल्या.