गुलशन कुमार हत्याप्रकरण : अब्दुल रौफ मर्चंट मुंबईत दाखल
By admin | Published: November 11, 2016 04:59 AM2016-11-11T04:59:33+5:302016-11-11T04:59:33+5:30
गुलशन कुमार हत्याकांडातील फरार असलेल्या दाउदचा खास हस्तक अब्दुल रौफ मर्चंटचा ताबा अखेर मुंबई पोलिसांना मिळाला आहे.
मुंबई : गुलशन कुमार हत्याकांडातील फरार असलेल्या दाउदचा खास हस्तक अब्दुल रौफ मर्चंटचा ताबा अखेर मुंबई पोलिसांना मिळाला आहे. गुरुवारी सकाळी तो मुंबईत दाखल झाला असून गुन्हे शाखा त्याच्याकडे अधिक तपास करत आहे.
रौफला २००९ साली नकली बांग्लादेशी पासपोर्ट बाळगल्याबद्दल बांग्लादेशकडून अटक करण्यात आली होती. मर्चेंटच्या अटकेनंतर पहिले त्याला गाजीपूरमधील काशिमपूर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला नोव्हेंबर २०१४ साली ढाकाच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. गुलशन कुमार यांच्या हत्येपासून अब्दुल रौफ फरार होता. बांग्लादेशमधील ढाकाच्या जेलमधून त्याला सोडण्यात आल्यानंतर बुधवारी मध्यरात्री बांग्लादेश प्रशासनाने मर्चंटला भारताच्या स्वाधीन केले.
इंडो - बांग्ला सीमेवर बीएसएफच्या जवानांनी त्याचा ताबा घेतला. तेथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेथील न्यायालयकाडून ट्रान्झीट रिमांडची मागणी मान्य केल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यास परवानगी मिळाली. तेथून रोडमार्गे त्याला गुवाहाटी येथे आणण्यात आले. तेथे मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने त्याचा ताबा घेतला. सकाळी ११.२५ ला रौफसह गुन्हे शाखेचे पथक मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्याला दुपारी उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)