Join us

गुलशन कुमार हत्या प्रकरण :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:06 AM

निर्माता रमेश तोरानी यांची निर्दोष सुटकातर एकाची जन्मठेप कायमगुलशन कुमार हत्या प्रकरण :निर्माता रमेश तोरानी यांची ...

निर्माता रमेश तोरानी यांची निर्दोष सुटका

तर एकाची जन्मठेप कायम

गुलशन कुमार हत्या प्रकरण :

निर्माता रमेश तोरानी यांची निर्दोष सुटका तर एकाची जन्मठेप कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. न्यायालयाने रौफची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, उच्च न्यायालयाने गुलशन कुमार यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता केली.

न्या. साधना जाधव व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने रौफ याच्या भावाची व आणि अन्य एक आरोपी अब्दुल रशीद मर्चंट याची झालेली सुटका रद्द करत त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. रशीद यानेच गुलशन कुमार यांना गोळी झाडली, असे न्यायालयाने रशीदची सत्र न्यायालयाने केलेली सुटका रद्द करताना म्हटले.

‘कॅसेट किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी जुहूमधील जित नगर येथील मंदिरातून बाहेर येताना त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तिघा हल्लेखोरांनी गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार, अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला २००२ मध्ये या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात येऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

रौफ याने गुलशन कुमार यांची गोळ्या घालून हत्या केली, हे सरकारी वकिलांनी नि:संशयपणे सिद्ध केले आहे. रौफ याचे कुमार यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. संगीतकार नदीम सैफी आणि अबू सालेम यांनी त्यांचे कुमार यांच्याशी वैयक्तिक वैर असल्याने रौफ याला कुमार यांच्या हत्येची सुपारी दिली, असे न्यायालयाने म्हटले.

नदीम सैफी आणि गँगस्टर अबू सालेम खटला सुरू असताना फरारी आरोपी म्हणून दाखवण्यात आल्याने त्यांच्यावरील खटला प्रलंबित राहिला. त्यानंतर सालेमला पोर्तुगालहून भारतात अटक करून आणण्यात आले.

तोरानी यांची सत्र न्यायालयाने केलेली सुटका कायम करताना न्यायालयाने म्हटले की, तोरानी यांनी अबू सालेम, नदीम सैफी यांच्याबरोबर गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणे योग्य नाही.

‘या प्रकरणात थेट पुरावे आहेत. सदर प्रकरणी आम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे कौतुक करायला हवे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी केवळ ते या घटनेचे साक्षीदार असल्याचा दावा केला नाही तर त्यांनी मागेपुढे न पाहता गुलशन कुमार यांना मदत केली. ड्रायव्हरने त्यांना रुग्णालयात नेले तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. सत्याच्या बाजूने उभे राहण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही’, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, नदीम सैफी आणि तोरानी यांनी गुलशन कुमार यांची हत्या करण्यासाठी अबू सालेम याला सुपारी दिली होती. २९ एप्रिल २००२ मध्ये सत्र न्यायालयाने या प्रकरणातील १९ पैकी १८ आरोपींची निर्दोष सुटका केली. केवळ रौफ यालाच दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

रौफ याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले तर राज्य सरकारने तोरानी यांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारी उच्च न्यायालयाने रौफ याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली तर अब्दुल रशीद मर्चंट याची सुटका रद्द केली. रशीद याला हत्या, कट रचणे इत्यादी आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला ट्रायल कोर्टाला शरण जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने रौफची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सततच्या गुन्हेगारी कारवायांची तसेच हत्येनंतर बराच काळ फरार असल्याची दखल घेत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेत कोणत्याही प्रकारची माफी देऊ नये, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. ‘न्यायादाखल आणि समाजाच्या हितासाठी तो (रौफ) दया दाखवण्यास पत्र नाही’, असे खंडपीठाने म्हटले.

कुमार यांच्या हत्येनंतर रौफ फरारी झाला होता. २००१ मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये फर्लो मंजूर करण्यात असताना मर्चंट बांगलादेशात पळून गेला होता. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केल्यामुळे त्याला बांगलादेशात अटक करण्यात आली आणि पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पहिल्या शिक्षेची पूर्तता केल्यावर दहशतवादी संबंधांवरून डिसेंबर २०१४ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशने त्याला भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.