Gunaratna Sadavarte News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक करा, आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशा एकमुखी मागण्या बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्वपक्षीय नेते व सामान्य नागरिकांनी केल्या. सत्ताधारी नेत्यांसह विरोधक, सर्वधर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. आरोपींना अटक झाली नाही, तर हे आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांना पाठिंबा दर्शवला आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला १९ दिवस उलटूनही यातील आरोपींना अटक झालेली नाही. सर्व फरार आरोपींना अटक करावी, त्यामागचा मास्टर माइंड शोधून त्यास फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, वाल्मीक कराडला हत्येचा कट रचला म्हणून आरोपी करून अटक करावी, आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा निघाला. या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बीड मोर्चावर टीका केली आहे.
बीडमधील मोर्चा वाटला नाही, तो शिमगा
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता. तो मोर्चा वाटला नाही, तो शिमगा वाटत होता. मोर्चात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यात आल्या, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. तर एखादी आदरांजलीची सभा असेल तर अशा प्रकारचे वर्तन असू शकते का? अशी विचारणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तसेच हा मोर्चा असंवैधानिक होता. वाल्मीक कराड यांना अटक करा असे तुम्ही म्हणत आहात, पण ते आतापर्यंत कुठल्या एफआयआरमध्ये आहेत का? आधी फाशी आणि नंतर चौकशी असा कायदा आहे का जगात? धनंजय मुंडे वंजारी आहेत म्हणून टार्गेट करत आहात का? असे एकामागून एक प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी केले.
दरम्यान, आमदार म्हणून शपथ घेतलेले सुरेश धस यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात कलावंतांना अशा प्रकारे अपमानित करण्याचे धारिष्ट धसमध्ये कसे आले? विधानसभेच्या सभापतींनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाई करावी. प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा आहे. प्राजक्ता माळी, राश्मिका मंदाना, सपना चौधरी या सर्वांना माझा पाठिंबा आहे. कलावंतांना कोणी अपमानित करत असेल तर त्या लोकांना विरोध करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही कलावंतांसोबत आहोत, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केली.