Join us

गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 5:00 PM

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

मुंबई - एसटी कामगारांचे नेते आणि उच्च न्यायालयातील वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का मिळाला आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली. दरम्यान, यापूर्वीच बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक मिळणार नाही. तसेच, बार कौन्सिलविरुद्ध काहीही बोलायला मुभा देणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना सुनावलं होतं. आता, पुन्हा एकदा हायकोर्टाने सदावर्तेंना फटकारलं आहे.  

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ॲड. सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. यानंतर ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही न्यायमूर्तींनी सदावर्तेंना खडसावलं आहे. 

हायकोर्टाने सदावर्ते यांना खडसावताना म्हटलं की, तुम्ही प्रेससमोर नाहीत, तर कोर्टात दाद मागायला आलात याचं भान राखा. सदावर्ते यांची भाषा आक्रमक आणि आवाज मोठा होता. त्यामुळे न्यायमूर्ती पटेल यांनी त्यांनी दोन वेळा समज दिली. मीडिया आणि प्रेस माझी बदनामी करत आहेत. असं सदवर्ते यांनी न्यायालयात सांगितलं होतं. आपली सनद दोन वर्षांसाठी रद्द झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी, हा प्रसंग घडला, याबाबत साम टीव्हीने वृत्त दिले आहे. 

सदावर्तेंवर ठेवण्यात आलेला आरोप

पेशाने वकील असताना गुणरत्न सदावर्ते वकिलांच्या आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करतात. मीडियासमोर, वादविवाद कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनादरम्यान ते वकिलाचा बँड परिधान करुन जातात, असं ॲड. सुशील मंचेकर यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर 7 फेब्रुवारीला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.  

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेमुंबईउच्च न्यायालय