गुंदवली ते मोगरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुपरहिट प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:33 AM2023-01-20T06:33:55+5:302023-01-20T06:34:24+5:30

मुंबईकर अन् मेट्रो कामगारांसोबत प्रवास करतानाच साधला संवाद

Gundvali to Mogra; Prime Minister Narendra Modi's super hit journey... | गुंदवली ते मोगरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुपरहिट प्रवास...

गुंदवली ते मोगरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुपरहिट प्रवास...

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मुंबईची कोंडी फोडणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उर्वरित टप्प्याला गुरुवारी अंधेरी येथील गुंदवली स्थानकात मेट्रोला ग्रीन सिग्नल देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली ते मोगरा असा रिटर्न प्रवास करत मुंबईकरांची मने जिंकली. मेट्रोच्या प्रवासादरम्यान मोदी यांनी विद्यार्थी, मुंबईकर यांच्यासह मेट्रो कामगारांसोबत प्रवास करतानाच त्यांच्यासोबत संवादही साधला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही प्रवास करताना होत असलेल्या गप्पांमुळे हास्याचे फवारे उडत असल्याचे चित्र होते. याचवेळी मेट्रोमधून प्रवास करताना मोदी यांनी बाहेरील नागरिकांना हात उंचावून शुभेच्छादेखील दिल्या.

वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मेट्रोकडे वळला. अंधेरी परिसरातील गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकात दाखल होतानाच मोदी यांनी आपल्या ताफ्यातून मुंबईकरांना हात उंचावून दाखविले. मेट्रोचा प्रवास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र सायंकाळी ७ च्या सुमारास अंधेरी येथील गुंदवली स्थानकात दाखल झाले.

स्थानक परिसरात दाखल होताच मोदी यांनी गाडीतूनच उपस्थितांना हात उंचावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. गुंदवली स्थानकात दाखल झाल्यानंतर मोदी यांनी मुंबई १ मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) चा प्रारंभ केला. 

सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल. याच्या मदतीने युपीआयद्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल. याचवेळी त्यांनी येथील मेट्रो फोटोच्या प्रदर्शनाची पाहणी केली.

ऐन पीक अवरला वेस्टर्न सुसाट !

  • पश्चिम उपनगरात संध्याकाळी वांद्रे, मिलन सब वे, विमानतळ परिसर अशा पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्रत्येक टप्प्यात वाहतूक कोंडी होते. 
  • पीक अवरला तर या कोंडीत दोन दोन तास अडकावे लागते. मात्र, गुरुवारी संध्याकाळी हा मार्ग सुपरफास्ट होता. 
  • बहुतांशी कार्यालये लवकर सोडण्यात आल्याने आणि अनेकांना वर्क फॉर्म होम देण्यात आल्याने या मार्गावर वाहनांचे प्रमाण कमी होते. 

 

सीएसएमटीचा अडीच वर्षांत कायापालट

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले.
  • सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारीला खुली होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यांत काम सुरू करण्यात येणार आहे. 
  • सीएसएमटी स्थानकांचे पुनर्विकासाचे काम अडीच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. 
  • मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची  इमारत हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. 
  • युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे. सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च १,८१३ कोटी रुपयांचा आहे. 

 

मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क तयार करणे हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या भौतिक प्रगतीच्या दिशेने प्रवास २०१४ मध्ये पहिल्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर सुरू झाला. या मेट्रो मार्गांची पायाभरणी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर  युटिलिटी शिफ्टिंग, भूसंपादन, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या अनेक अडथळ्यांचे निराकरण केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातले पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. मेट्रो मुंबईकरांची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे. - एस. व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: Gundvali to Mogra; Prime Minister Narendra Modi's super hit journey...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.