Join us  

ST Strike: “उच्च न्यायालयाने एसटीचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही”; गुणरत्न सदावर्तेंचे अनिल परबांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 6:43 PM

ST Strike: आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा मंत्र्याने यामध्ये लक्ष घालावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी तीव्र होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवला असल्याचे म्हटले होते. याला विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिले असून, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला नाही, असे म्हटले आहे.  

संप करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. अनिल परब यांचा खोटारपडेपणा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा मंत्र्याने यामध्ये लक्ष घालावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. एक मंत्री म्हणून अनिल परब तुमच्याकडून चुकीची माहिती पसरवण्याची अपेक्षा नाही, असा टोलाही सदावर्ते यांनी लगावला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा

तरुण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समोर आले पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मला असे वाटते की, मुख्यमंत्री याबाबत कॉल घेतील आणि योग्य चर्चा करून योग्य ते न्यायलयात मांडतील, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे. तसेच पगाराचा, एरियर्स किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळाले, तर ती मेहरबानी नाही. ते आमच्या हक्काचे पैसे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणाची आहे. अनिल परब तुम्ही या मागणीचा काहीच विचार केला नाही. बाकी आम्ही केलेल्या कामाचा मोबदला दिला जातोय, तो आमचा हक्क आहे, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अनिल परब यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याबद्दलची याचिका दाखल केल्याबाबत सदावर्ते म्हणाले की, तुमची अवमान नोटीस सोडा तुमच्या याचिकेचे काय होते ते पण आम्ही पाहणार आहोत. न्यायलयात तुम्ही सांगितले होते की, अवमानाची नोटीस पाठवा. परंतु, न्यायालयाने आम्हाला उत्तर दाखल करायला सांगितले आहे, असे सदावर्ते म्हणाले. तत्पूर्वी. राज्य सरकारने आतापर्यंत ९१८ हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.  

टॅग्स :एसटी संपअनिल परबआदित्य ठाकरे