Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:50 PM2022-04-20T15:50:18+5:302022-04-20T15:51:43+5:30

Gunratna Sadavarte: पहिल्या दिवसांपासून माझ्यासह माझी १३ वर्षांची मुलगीही पोलिसांना सहकार्य करत असल्याचे गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाला सांगितले.

gunratna sadavarte confessed in girgaon court that he collect money from st employees during strike | Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

Next

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच अन्य प्रकरणांसंदर्भात चौकशी करण्यासाठी सातारा, पुण्यासह अन्य विभागाचे पोलीस सदावर्ते यांना टप्प्याटप्प्याने ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा सदावर्ते यांचा ताबा घेतला. तसेच सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी त्यांना गिरगाव येथील कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणीवेळी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. 

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य 

गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद करताना, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे म्हणून पोलीस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच मी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य करतो, पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज? पोलीस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त १३ वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, एकाही कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही, असं सदावर्ते याआधी वारंवार सांगायचे, मात्र आता त्यांनी पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गिरगाव कोर्टाने अखेर गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
 

Web Title: gunratna sadavarte confessed in girgaon court that he collect money from st employees during strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.