मुंबई - उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक केली आहे. त्यानंतर, आज न्यायालयात हजर करण्यात आले.
गुणरत्न सदावर्तेंना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किला कोर्टात आणण्यात आले. त्यावेळी, आपल्या मुलीला पाहून त्यांनी तिला मिठी मारली. गाडीतूनच मीडियाशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्यात येत आहे. एका वकिलाच्या हक्कांवर गदा आणली जात असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. माझी हत्या होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी दिली.
दरम्यान, आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदोलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली होती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.
डर्टी पॉलिटीक्स होत आहे - पाटील
गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील-सदावर्ते यांनी पोलीस प्रशासन आणि शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करतात असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच गुणरत्न सदावर्तेंची अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही जयश्री पाटील यांनी केला आहे.
सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे. व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं. तसेच माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले. कष्ट करी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांची पवारांशी फोनवरून चर्चा-
हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकी घटना कशी घडली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून घेतली. या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.