मुंबई - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका क्षेत्रामध्ये मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना प्रतिबंध म्हणून महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्या असून, त्यांची वेगाने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील एकूण ६६ हजार ९५९ ठिकाणी गप्पी मासे सोडून जीवशास्त्र पद्धतीने डासांच्या अळ्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून केला जाणार आहे. या शिवाय पालिकेकडून संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये २२७ धूर फवारणी यंत्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
डास नियंत्रणासाठी बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच सरकारी, निमसरकारी प्राधिकरणांच्या इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करण्याबाबत व अडगळीचे साहित्य काढण्याबाबत या समितीच्या बैठकीत आढावा घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यायची खबरदारी!घराशेजारील परिसरात असणारे टायर, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट-बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याने यानिमित्ताने केले आहे.
डासांची उत्पत्ती स्थाने केली नष्ट १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीदरम्यान महापालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ४९ हजार ४७६ घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटींमध्ये एकूण ४ लाख ४७ हजार १८८ पाण्याच्या टाक्या तपासण्यात आल्या. तर एकूण ४ लाख २८ हजार १९६ पाण्याच्या टाक्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण १० हजार ७८८ इतक्या मोठ्या प्रमाणात ॲनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थाने आढळली असून, ती तत्काळ नष्ट करण्यात आली. पालिका प्रशासनाने साथींचे आजार रोखण्यासाठी पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले.