सुशांत मोरे, मुंबईचार दिवसांपूर्वीच काही नायजेरियन नागरिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड स्थानक परिसरात धुमाकूळ घातला आणि या स्थानकात दगडफेक करून रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस केली. हे सर्व जण गर्दुल्ले असल्याचे उघडकीस आले. महत्त्वाची बाब म्हणजे मस्जिद स्थानक ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक परिसरात तब्बल ४0 नायजेरियन गर्दुल्ले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांचा वापर केला जात असून एकप्रकारे प्रवाशांना धोकाच आहे. त्यांच्याविरोधात ठोस अशी कारवाई अद्यापही न करता रेल्वे प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. मागील शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक ब्रिज परिसरात नायजेरियन गर्दुल्ल्यांनी आपला डेरा टाकला आहे. काही स्थानिक आणि गर्दुल्ल्यांमध्ये वाद झाला. त्याची माहिती मिळताच डोंगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येताच नायजेरियन गर्दुल्ल्यांनी दगडफेक करत सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाकडे धाव घेतली आणि या स्थानकाच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि तेथून पळ काढला. त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवरील ट्यूबलाइट, पंखे तसेच इंडिकेटर्सचे नुकसान केले. या घटनेनंतर शहर पोलीस, आरपीएफ (रेल्वे पोलीस दल) आणि जीआरपीकडून (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) घटनास्थळी भेट देण्यात आली. या भेटीनंतर नायजेरियन गर्दुल्ल्यांविरोधात ठोस अशी कारवाई झालेली नाही. रेल्वे पोलिसांकडून चालढकल केली जात असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्जिद स्थानक ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक परिसरात जवळपास ४0 नायजेरियन गर्दुल्ले असून ते नशेसाठी सॅण्डहर्स्ट रोड येथे असलेल्या लूप लाइनचा तसेच पुलाखालील जागेचा वापर करतात. तसा पत्रव्यवहार दोन रेल्वे पोलीस यंत्रणेतही झाला आहे. मात्र याविरोधात रेल्वे पोलिसांकडून ठोस कारवाईची भूमिका घेण्यात आलेली नाही. मुळात सीएसटी ते दादर स्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले असल्याच्या तक्रारी असूनही रेल्वे पोलिसांना असूनही कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)
गर्दुल्ल्यांचा रेल्वे प्रवाशांना धोका
By admin | Published: April 09, 2015 5:03 AM