Join us

सिडकोचा पदभार गगराणींनी स्वीकारला

By admin | Published: April 15, 2016 2:35 AM

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.

मुंबई : सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. संजय भाटिया यांची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.भाटियांची बदली आणि त्यांच्याजागी गगराणींची नियुक्ती याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्याची अंमलबाजवणी बुधवारी झाली. नव्या जबाबदारीबद्दल ‘लोकमत’शी बोलताना गगराणी म्हणाले, ‘नवी मुंबईतील विमानतळ आणि नयना हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्यासमोर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल, अशी घोषणा केली आहे. त्याच्या पूर्ततेसाठी सिडकोची टीम झोकून देऊन काम करेल. शिवाय, नयना या नव्या शहराच्या निर्मितीसाठी गती देण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. गगराणी यांनी एमआयडीसीमध्ये असताना कोणतेही वाद न होता, १६ हजार एकर एवढी मोठी जमीन एमआयडीसीच्या छत्राखाली आणली. डीएमआयसीच्या कामांना गती देण्यासोबतच त्यांनी परवाना राज कमी करण्याचे मोठे काम केले. ‘मेक इन इंडिया’ ही केंद्राची महत्त्वाकांक्षी प्रदर्शनी मुंबईत यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अत्यंत मृदुभाषी म्हणून ओळख असणाऱ्या गगराणी यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्यांच्या या कामांमुळेच या वर्षी त्यांचे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’ पुरस्कारासाठी नामांकनही झाले होते. (विशेष प्रतिनिधी)