- मनोहर कुंभेजकर
मुंबई - 2019 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे विद्यमान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कामत यांचा सुमारे 1 लाख 83 हजार मतांनी पराभव झाला होता.त्यावेळी "हर हर मोदी..घर घर मोदी"अशी मोठी मोदी लाट होती आणि विशेष म्हणजे यावेळी शिवसेना भाजपा युती होती.या निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी ते नाउमेद झाले नाहीत.त्यांच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा पोलीस ठाण्याच्या कार्यालयात रोज आणि विशेष करून शनिवार व रविवारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते.
तर त्यांनी उत्तर पश्चिम मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरा देसाई रोड वरील कंट्री क्लब मध्ये त्यांनी अलिकडेच आयोजित केलेल्या "गेट टू गेदरला"माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार अमित देशमुख,माजी राज्य मंत्री कृपाशंकर सिह,नसीम खान,बाबा सिद्धीकी,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे,माजी महापौर अँड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते व पदाधिकारी देखिल आले होते.दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कामत हे गेट टू गेदर आयोजित करतात अशी माहिती त्यांचे सक्रिय कार्यकर्ते महेश मलिक यांनी दिली.
शिवसेनेच्या काल वरळी येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढले अशी महत्वपूर्ण घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.तर निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत नुकतेच केले होते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आगामी निवडणुकां मध्ये युती झाली तर दोघांचा फायदा होईल, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अलिकडेच केले होते.
कामत हे येथूनच लोकसभा निवडणूक लढविणार हे आता निश्चित झाले असून त्यांचे शिवसेना व भाजपाला कडवे आव्हान असेल.त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात गेल्या 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सहा जनआक्रोश सभांना हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली होती.तर त्यापूर्वी दीड महिना त्यांनी हा संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता.या जनआक्रोश सभांच्या भव्य यशानंतर आज सायंकाळी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील नेहरू नगर आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघात पाटलीपुत्र परिसरात त्यांनी अशा दोन जनआक्रोश सभांचे आयोजन केले आहे. यानंतर त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महिन्याभराचा जनसंपर्क अभियान कार्यक्रम घोषित केला आहे. येत्या २७ जानेवारीपासून ते २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर या मतदारसंघातील ४० वार्डात हे अभियान राबविले जाणार आहे.२७ जानेवारीला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून या अभियानाची सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
हे जनसंपर्क अभियान म्हणजे गेल्या काही वर्षांत सातत्याने केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचाच एक भाग आहे.थेट जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. जनतेला भेडसावणा-या समस्या महानगरपालिका, कलेक्टर आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जनतेचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न करण्याची ही योजना आहे असे कामत यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.