गुरुजी घरी... शाळेत एक्क्यावर दुर्री... सांगा, कसा घडणार सक्षम भारत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:37 AM2023-09-28T05:37:23+5:302023-09-28T05:37:46+5:30
शाळेत असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने बुधवारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला.
सुरेश काटे
तलासरी : विद्येची देवता असलेल्या श्रीगणेशाच्या आराधनेचा उत्सव सुरू असतानाच ज्यांनी विद्यादानाचे काम करत पुढची पिढी घडवायची त्या शिक्षकानेच रोजंदारीवर दुसरा शिक्षक नेमल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रोजंदारीवरचा शिक्षक निवृत्त असल्याने आणि त्याचे शाळेकडे लक्ष नसल्याने मुलांनी शिक्षण सोडून वर्गातच पत्ते खेळत जुगाराचा डाव मांडला आहे. सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेत असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने बुधवारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला.
पहिली ते चौथीपर्यंतची ही एकशिक्षकी शाळा असून, तेथे १४ मुले शिक्षण घेतात. या मुलांना शिकवण्याचाही कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून ३०० रुपये रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवले. तोही निवांत बसून असल्याने, शिवकायला कोणी नसल्याने कंटाळलेल्या मुलांनी वर्गातच जुगाराचा डाव मांडल्याचे यावेळी दिसून आले. तलासरीला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाले; पण त्यांना मदत करायला ना विस्तार अधिकारी आहे, ना केंद्रप्रमुख. त्यामुळे तालुक्यात शिक्षकांची मनमानी वाढली आहे. त्याचेच एक उदाहरण सूत्रकार डोंगरपाडा शाळेत उघड झाले.
शिक्षक गायब
तक्रारी वाढल्याने सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता प्रमुख शिक्षक रविकुमार सुभाष फेरे गायब असल्याचे दिसून आले. ते गणपतीसाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले. गावी जाताना त्यांनी ३०० रुपये रोजंदारीवर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचे आढळले.
अर्ज न भरता रजेवर तलासरी पंचायत
समितीचे गटशिक्षण अधिकारी निमेश मोहिते यांना परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तत्काळ केंद्रप्रमुख मदन शिंगडा यांना शाळेत पाठवले. तेव्हा रविकुमार फेरे रजेचा अर्ज न भरताच गावी निघून गेल्याचे स्पष्ट झाले.
रोजंदारीवर शिक्षक नेमल्याची घटनाही खरी असल्याचे दिसले. तसा अहवाल शिक्षण विभागाला देण्याचे, तसेच या शाळेत दुसरा शिक्षक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात येईल.
- निमेश मोहिते,
गटशिक्षणाधिकारी, तलासरी
दोषी शिक्षकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर