गुरूचे मार्गदर्शन महत्त्वाचे - बोरकर
By admin | Published: March 13, 2016 03:50 AM2016-03-13T03:50:49+5:302016-03-13T03:50:49+5:30
पूर्वी कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महत्त्व दिले जात नसे. सुदैवाने मला योग्य गुरूचे मार्गदर्शन लाभले आणि हार्मोनियम वादनात उत्तम कामगिरी करु शकलो.
मुंबई : पूर्वी कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महत्त्व दिले जात नसे. सुदैवाने मला योग्य गुरूचे मार्गदर्शन लाभले आणि हार्मोनियम वादनात उत्तम कामगिरी करु शकलो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात अव्वल ठरण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ हार्मोनियमवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते तुळशीदास बोरकर यांनी गोवा महोत्सवात केले.
‘आमी गोयेंकर’ संस्थेतर्फे शनिवारी दादर येथील सावरकर स्मारकात दोन दिवसीय गोवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गोवेकरांना आजीवन योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी तुळशीदास बोरकर बोलत होते. ‘कला’ क्षेत्र आणि त्यातील बदलाविषयी त्यांनी मते मांडली. ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात ‘पेटी वाजवतो’ असे म्हणून मला हिणवले जायचे. कलेची व्याप्ती त्या काळी लोकांना कळत नव्हती. पण आता ती कळते याचे समाधान आहे.
दरम्यान, आजीवन योगदान पुरस्काराने रामकृष्ण नाईक आणि अशांक देसाई यांनाही गौरवण्यात आले. कला क्षेत्रातल्या स्थित्यंतराविषयी त्यांनीही आपली मते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इंडोको रेमिडीजचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी भूषविले, तर महोत्सवाचे उद्घाटन अरुणा सुरेश कारे यांच्या हस्ते झाले. गोव्यातील उद्योजकांना चालना मिळावी यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. (प्रतिनिधी)