मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, अवकाळी पाऊस पथ्यावर; AQI अगदी १०० च्या खाली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:23 PM2023-11-27T12:23:09+5:302023-11-27T12:24:08+5:30
मुंबईतील बांधकामं, प्रदूषण यामुळे गेल्या महिन्याभरापासून शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली होती.
मुंबईतील बांधकामं, प्रदूषण यामुळे गेल्या महिन्याभरापासून शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली होती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) चक्क ३०० च्या पार पोहोचला होता. पण काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे.
रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली येण्यास मदत झाली आहे. आज देखील मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.
मुंबई परिसरात आज सकाळी साडेसात वाजताच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांकानुसार एकाही विभागात AQI १०० च्या वर नव्हता. तर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण परिसरापैकी ९० टक्के भागात AQI हा ५० पेक्षा खाली राहिला आहे.
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची आज सकाळी ७.३० वाजताची आकडेवारी
पवई- १८
मुंबई विमानतळ- २७
ठाणे- २७
कांदिवली- २८
अंधेरी- २८
विरार- ३३
ऐरोली- ३४
चेंबूर- ३७
कुर्ला- ३८
बोरीवली- ३८
कुलाबा- ४१
कल्याण- ४१
वरळी- ४६
वांद्रे- ६०
सीवूड्स- ६८
नेरुळ- ८५