लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुटख्याला बंदी असतानाही मुंबईत सर्रास गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसत आहेत. यात पान टपरीसह छोट्या जनरल स्टोअरमधूनही गुटखा सहज उपलब्ध होत आहे. गेल्या वर्षभरात, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या धाडसत्रात तब्बल अडीच कोटी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
गुटखा, तंबाखूमुळे मोठ्या प्रमाणात कर्करोगाचा धोका वाढत आहेत. मुंबईतील विशेषत: झोपडपट्टी भागात पान टपरीसह छोट्या जनरल स्टोअरमध्ये याची विक्री होताना दिसते आहे. प्रमुख टोलनाके, तसेच द्रुतगती मार्गासह प्रमुख रस्त्यावर काही मुले हातात गुटखा, तंबाखूचे पाकीट घेत, वाहनांच्या मागे धावताना दिसतात.
गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश या भागांतून मोठ्या प्रमाणात मुंबईत गुटखा आणला जात असल्याचे एफडीएच्या कारवाईतून समोर येत आहे.
...
स्लीपर सेलप्रमाणे सुरू आहे काम...
गेल्या काही वर्षांत गुटखाविक्री करणाऱ्यांची मोड्स ऑपरेंडी बदललेली आहे. एखाद्या स्लीपर सेलप्रमाणे सध्या यांचे काम सुरू आहे. बॉर्डरपर्यंत मोठ्या ट्रक, टेम्पोतून गुटखा येताच, तिथून पुढे छोट्या छोट्या वाहनांतून तो मुंबईत आणला जात आहे. यात, वाहनात क़ाय आहे याबाबत चालकही अनभिज्ञ असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत धाडसत्र सुरू आहेत.
- शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध विभाग, मुंबई
...
अपुरे मनुष्यबळ...
गुटखा संबंधित कारवाईसाठी मुंबईत किमान १७६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र या ठिकाणी अवघ्या ३३ जणांच्या खांद्यावर या कारवाईचा भार आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांना सायंकाळी ६ नंतर थांबविणे शक्य नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर याचा ताण पडत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याही परिस्थितीत पथकाकड़ून धाडसत्र सुरू आहेत.
....
१० ते २० रुपयात उपलब्ध...
मुंबईत अवघ्या १० ते २० रुपयात गुटखा उपलब्ध होताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात हाच चार ते पाच पटीने विकला जात होता.
....