मुंबई - भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर महाराष्ट्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. तेंडुलकरची मंगळवारी महाराष्ट्राच्या 'स्वच्छ मुख अभियाना'चा 'स्माइल ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली. तोंडाच्या स्वच्छतेच्या प्रचाराशी संबंधित ही एक मोहीम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकरने ही जबाबदारी स्विकारली त्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. तर, या जबाबदारीसाठी सचिनच योग्य व्यक्ती का आहेत, हेही सांगितलं. तर, आपल्या भाषणावेळी, सचिनने राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटखा विकला जात असल्याची खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सचिन तेंडुलकरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे सचिन तेंडुलकर पुढील पाच वर्षांसाठी या अभियानाचा 'ब्रँड ॲम्बेसेडर' असणार आहे. 'स्वच्छ मुख अभियान' हे 'इंडियन डेंटल असोसिएशन'ने तोंडाची स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुरू केलेले राष्ट्रीय अभियान आहे. मात्र, आज राज्यात गुटखाबंदी असतानाही अनेक ठिकाणी गुटखा मिळत असल्याची खंत यावेळी सचिनने व्यक्त केली.
दरम्यान, सचिनने आपल्या भाषणात तोंडाच्या आजारावर भाष्य करताना शारिरीक फिटनेस म्हणजे केवळ वरुन दिसणार लूक नव्हे, शरिरातील अनेक महत्वाच्या गोष्टी वर्णन केल्या. भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश आहे, पण देशातील तरुणाई तेवढी हेल्थी आणि फिट आहे का? असा प्रश्न सचिनने केला. तसेच, भारत हा डायबेटीस रोगाची राजधानी असल्याचंही त्यांने सांगितलं. मला जेव्हा कळालं की, ५ ते १५ वर्षे वयाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांना तोंडाचे आजार आहेत, ही गंभीर बाब आहे. यामुळे ती मुले आत्मविश्वास गमावतात. यावेळी, राज्यात सरकारने गुटखा बंदी केली आहे, पण आजही तो कुठे-कुठे विकत मिळतो, असे सचिने गृहमंत्र्यांसमोर स्पष्टपणे सांगितले. तसेच, आपल्या गुरुजनांनीही अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत असेही सचिन म्हणाला. आपले गुरू हे आपले रोल मॉडेल असतात, पण दुर्दैवाने अनेक शिक्षक आणि गुरुजन वर्ग हे तंबाखू आणि गुटख्यांसारखे पदार्थ सेवन करतात. त्यातून नवी पिढी अनुकरण करते, हे चुकीचं असल्याचं सचिनने स्पष्टपणे म्हटलं.
सचिनच योग्य व्यक्ती यावेळी, भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तरुणांमध्ये गुटखा, तंबाखू, खर्रा, यांसारखे पदार्थ खाण्याच्या प्रमाणावर भाष्य केलं. विशेष म्हणजे काही सेलिब्रिटीच या पदार्थांच्या जाहिराती करत असल्याचे त्यांनी नाव न घेता निदर्शनास आणून दिले. तर, याउलट सचिन तेंडुलकर हे कधीही अशाप्रकारच्या जाहिराती करत नाहीत. त्यामुळेच, ते या अभियानाचे अॅम्बेसिडर बनून अतिशय योग्य व्यक्ती असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.