Join us  

गुटखाकिंग जगदीश जोशीला जामीन मंजूर; दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा वहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 6:28 AM

विशेष मकोका न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला जोशी याने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गोव्यातील गुटखाकिंग जगदीशप्रसाद मोहनलाल जोशी (६८) याच्या शिक्षेविरोधातील अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याची सोमवारी जामिनावर सुटका केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा भाऊ अनिसला २००२ मध्ये कराची येथे गुटख्याचे युनिट सुरू करण्यास मदत केल्याप्रकरणी जे. एम. जोशीला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

विशेष मकोका न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला जोशी याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठाने जोशीच्या शिक्षेला स्थगिती देत एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला व अन्य अटीही घातल्या. जानेवारी महिन्यात विशेष मकोका न्यायालयाने जोशी यांच्यासह मरुद्दीन अन्सारी आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख मन्सुरी यांना भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्याचा कट रचल्याबद्दल आणि मकोकातील काही तरतुदी अंतर्गत दोषी ठरवत १० वर्षे कारावसाची शिक्षा ठोठावली. अन्सारी आणि मन्सुरी यांनीही शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, धारीवाल व जोशी यांच्यात वाद होते. दोघेही आधी एकमेकांचे गुटखा व्यवसायातील भागीदार होते. जोशीने गोवा गुटख्याचे उत्पादन सुरू केले. दोघेही आपापसातील आर्थिक वाद सोडविण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी वाद सोडविण्यासाठी दाऊदशी संपर्क साधला. त्या मोबदल्यात कराचीमध्ये गुटख्याचा कारखाना स्थापन करण्यास मदत करण्याची मागणी दाऊदने दोघांकडे केली आणि जोशीने ती जबाबदारी घेतली. जोशींकडून ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी जोशीला या प्रकरणात गोवल्याचा युक्तिवाद केला. जोशीला कोणताही फायदा मिळाला नसल्याचे पोंडा यांनी म्हटले.