पश्चिम रेल्वेत खुलेआम गुटखा विक्री
By admin | Published: February 27, 2015 11:00 PM2015-02-27T23:00:45+5:302015-02-27T23:00:45+5:30
पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे प्रवासात खुलेआम गुटखा विक्री केली जाते. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षा
बोर्डी : पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड ते विरार रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे प्रवासात खुलेआम गुटखा विक्री केली जाते. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल मिडीयाचा वापर आदिंना महत्व देण्यात आले आहे. दरम्यान रेल्वे बजेटनंतर या गैरप्रकारांना आळा बसेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाने गुटखा व पानमसाल्यावर बंदी घातली आहे. पश्चिम रेल्वेच्या महाराष्ट्रातील विरार ते बोर्डीरोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन रेल्वे गाड्यातुन खुलेआम गुटखा विक्री केली जाते. यामध्ये प्रामुख्याने विरार-वापी शटल, बांद्रा-वापी पॅसेंजर अशा सर्व स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यादेखत गैरप्रकार घडत असताना डोळेझाकपणा केला जातो. रेल्वे स्थानक व परिसरातील गुटख्याची रिकामी पाकीट पडलेली दिसून येतात. महाराष्ट्रासह केरळ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी गुटखाबंदी घातली आहे. मात्र शेजारच्या गुजरात राज्यात गुटखा बंदी घातली नाही. या संधीचा फायदा गुटखा व्यापारी व दलालांनी घेतला असून अबला महिला व बालकामगारांना अवैध व्यापारात गोवण्यात येत आहे. रेल्वे गाड्यातून बेकायदा गुटख्याची आयात करून डहाणू तलासरी, तालुक्यातील खेडोपाडी पोहचवणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाला हे रोखण्यात यश येत नाही.
दरम्यान रेल्वेमंत्री प्रभू महाराष्ट्रातील असून त्यांना गुटखा बंदीची कल्पना आहे. रेल्वे बजेटद्वारे रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल मीडीयाचा वापर त्यांना विशेष महत्व देण्यात आले आहे. तथापि रेल्वे गाड्यातुन चालणाऱ्या गुटखा विक्रीवर ते बंदी घालतात काय? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)