ग्वाल्हेरमध्ये नाट्यकला जोपासतेय 'आर्टिस्ट कंबाइन'...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:33+5:302021-06-30T04:06:33+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मराठी नाटक केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर इतर राज्यांतही सादर होत आले आहे. महाराष्ट्रातून इतर ...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मराठी नाटक केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर इतर राज्यांतही सादर होत आले आहे. महाराष्ट्रातून इतर प्रांतांत जाऊन मराठी रंगकर्मींनीही नाटक रंगवले आहे आणि त्याचबरोबर स्थानिक रंगकर्मींनीही त्यात मोठे योगदान दिले आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्येसुद्धा मराठी नाटके रंगभूमी गाजवत आली असून, तिथे स्थायिक असलेल्या मराठी रंगकर्मींनी त्या प्रांतात नाट्यकला जोपासली आहे.
'आर्टिस्ट कंबाइन' ही ग्वाल्हेरमध्ये रंगभूमीवर सक्रिय असणारी संस्था आहे आणि सध्या या संस्थेचे रंगकर्मी हिंदी नाटकांच्या महोत्सवात गुंतले आहेत.
ग्वाल्हेरच्या 'आर्टिस्ट कंबाइन' या नाट्यसंस्थेने, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत हिंदी नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवात केवळ स्थानिकच नव्हे; तर प्रयागराज, मेरठ, कानपूर आदी प्रांतांतील नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. मात्र सध्याचा एकूणच निर्बंधांचा काळ लक्षात घेता, ही नाटके रंगभूमीवर न होता ती यूट्यूबच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत.
११ जुलै रोजी 'नागमंडल' (एकलव्य सांस्कृतिक समिती), २५ जुलै रोजी 'युगद्रष्टा' (हिंदुस्थानी अकादमी), ८ ऑगस्टला 'छू मंतर' (प्रयास नाट्यसंस्था), २२ ऑगस्टला 'अफीम के फूल (माध्यम रंगमंडल), १२ सप्टेंबर रोजी 'पगडी संभाल जट्टा' (लहर नाट्यमंच) आणि २६ सप्टेंबर रोजी 'जांच पडताल' (अनुकृती मंडल) या नाटकांचे प्रयोग संध्याकाळी ७.३० वाजता 'आर्टिस्ट कंबाइन'च्या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणार आहेत.
यंदा ८३ वे स्थापना वर्ष साजऱ्या करणाऱ्या 'आर्टिस्ट कंबाइन' या संस्थेने आठ दशकांच्या काळात ग्वाल्हेरच्या रंगभूमीवर अनेक मराठी, हिंदी व इतर भाषिक नाटके सादर केली आहेत. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसह देशभरात होणाऱ्या विविध नाट्यस्पर्धांत या संस्थेचे रंगकर्मी सातत्याने सहभागी होत आले आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. इतर प्रांतांतील नाट्यसंस्थांना निमंत्रित करत, त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्यही 'आर्टिस्ट कंबाइन' ही संस्था करत आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------