Join us

व्यायामशाळा, मेट्रो कामगारांच्या कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धारावी, माहीम, दादर या जी उत्तर विभागांतर्गत असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : धारावी, माहीम, दादर या जी उत्तर विभागांतर्गत असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत येथील रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेने या विभागातील दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, मद्यविक्रीची दुकानातील कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू केली आहे. त्याचबरोबर आता व्यायामशाळांमध्ये येणारी माणसे व प्रशिक्षक, तसेच मेट्रोचे काम करणाऱ्या कामगारांसाठी महापालिकेने कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे.

गेले दोन महिने मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या आता ५००- ६०० च्या आसपास आहे. मात्र, महापालिकेने दररोजच्या चाचणीचे प्रमाण १२ ते १५ हजारांपर्यंत ठेवले आहे; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील आता सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. जी उत्तर विभागातील धारावी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते, तर मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे दादरमध्ये लोकांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे या विभागात अधूनमधून रुग्णसंख्येत वाढ दिसून येते.

गर्दी वाढली तरी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ब्युटीपार्लर, ज्वेलर्सची दुकाने, कपड्यांची दुकाने, पेट्रोल पंप कामगार आदींची तपासणी चाचणी पालिकेने सुरू ठेवली आहे. मुंबईतील व्यायामशाळांमध्ये मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागांतील व्यायामशाळा कर्मचाऱ्यांसाठी सहा ठिकाणी कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

मेट्रो कामगारांचीदेखील चाचणी

दादरमध्ये पी.एल. काळे मार्ग, बाळ गोविंद रोड, एल.जे. रोड, माहीम, गोखले रोड, वीर सावरकर रोड, डी.एल. वैद्य रोड याठिकाणी मोबाइल व्हॅनमध्ये अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत. हे शिबिर पुढील आठ दिवस चालणार आहे. मुंबई मेट्रो धारावी जंक्शन येथे मेट्रोच्या कामगारांसाठी चाचणी शिबिर आहे.

आजची स्थिती...

विभाग... आज... आतापर्यंत... सक्रिय... डिस्चार्ज रुग्ण

धारावी ...०४....३,९०४......१४....३,५७८

दादर.....००.....४,८९८...८६...४,६३९

माहीम...०२....४,२७८....१०८...४,४७६