Mumbai Corona Unlock Updates: राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करुन 'अनलॉक'ला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत नेमकं कोणकोणत्या गोष्टी सुरू आणि कोणत्या बंद राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील 'अनलॉक'ची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईत आता जीम, रेस्टॉरंट्स, हॉटेल, सलून, स्पा, ब्लूटी पार्लर सुरू होणार आहेत. पण त्यासाठी वेळेचं बंधन घालून देण्यात आलं आहे.
मुंबईत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ब्लूटी पार्लर, स्पा, सलून आणि जीम दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहेत. दुपारी ४ नंतर या सर्व आस्थापना बंद राहतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला दुपारी ४ नंतर पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल. यासोबतच सलून, जीम, ब्लूटी पार्लर सुरू ठेवताना एसी बंद ठेवावा लागणार आहे. ज्या आस्थापनांमध्ये एसी सुरू असलेला आढळून येईल त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
थिएटर्स, मॉल्स बंदचमुंबईतील थिएटर्स आणि मॉल्स अद्याप बंद राहणार असल्याचं पेडणेकरांनी स्पष्ट केलं आहे. पण मुंबईत सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कमीत कमी उपस्थितीत करता येतील.
कार्यालयं ५० टक्के क्षमतेनं सुरूमुंबईतील खासगी कार्यालयांना आता दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात कार्यालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहता येणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लग्न सोहळ्याला ५० माणसांची मर्यादामुंबईत आता लग्न सोहळ्यासाठी वधू आणि वर दोन्ही मिळून ५० माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कारासाठी २० माणसांची उपस्थितीचा नियम कायम ठेवण्यात आला आहे. जॉगिंग ट्रॅक, गार्डन पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
मुंबई लोकल बंदचमुंबईत अनलॉकला सुरुवात झाली असली तरी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. शहराचा पॉझिटीव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्सची संख्या पाहून योग्य वेळी लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, असं महापौर म्हणाल्या.