सव्वासहा कोटींचे हेरॉइन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:43 AM2018-04-16T04:43:58+5:302018-04-16T04:43:58+5:30
राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले सव्वासहा कोटींचे हेरॉइन अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शनिवारी जप्त करून मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याला अटक केली.
मुंबई - राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले सव्वासहा कोटींचे हेरॉइन अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शनिवारी जप्त करून मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याला अटक केली. मंगीलाल हा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असल्याचा संशय पथकाला आहे. त्या दिशेने त्याची चौकशी सुरू आहे.
माटुंगा पश्चिमेतील टी.एच. कटारिया मार्गावर शनिवारी ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती एएनसीच्या वांद्रे पथकाला मिळाली. त्यानुसार एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून मंगीलालला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ४ किलो १०० ग्रॅमचे सव्वासहा कोटींचे हेरॉइन सापडले. मंगीलाल मूळचा राजस्थानचा आहे. त्याने हे ड्रग्ज कोणाकडून व कसे आणले, याचा शोध एएनसी घेत आहे. त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच त्याच्यातील क्रमांकावरून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.