Join us

केस खायची सवय, पोटातून काढला एक किलो पुंजका; दहावीतील मुलीवर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 3:47 PM

दहावीत शिकणाऱ्या एका मुलीच्या पोटातून जे जे रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी केसाचा किलोभर पुंजका लॅप्रोस्कोपिक सर्जरीने काढला.

मुंबई :

दहावीत शिकणाऱ्या एका मुलीच्या पोटातून जे जे रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी केसाचा किलोभर पुंजका लॅप्रोस्कोपिक सर्जरीने काढला. या मुलीला स्वतःचे केस काढून खायची सवय जडली होती. त्यामुळे या मुलीच्या पोटात इतका मोठा केसाचा पुंजका जमा झाला.डॉक्टरांनी सर्व चाचण्या करून बुधवारी, १३ सप्टेंबरला तिच्यावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. त्यांनी या मुलीच्या पोटातून किलोभर केसाचा पुंजका काढला. 

विक्रोळीतील साक्षी शिर्के (रुग्णाचे नाव बदलण्यात आले आहे.) या दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने पालकांनी अनेक स्थानिक डॉक्टरांना दाखविले. मात्र, साक्षी कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर शिर्के कुटुंबीयांना जे जे रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. 

त्या ठिकाणी त्या मुलीच्या पोटाची सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले की, साक्षीच्या पोटात केसाचा मोठा पुंजका आहे. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्याकडे या केसांबद्दल माहिती विचारली त्यावेळी ती सहजपणे केस खात आल्याचे लक्षात आले.

 ‘रॅप्युन्झेल सिंड्रोम’     साक्षीच्या पोटातून केसाचा पुंजका काढण्यासाठी सर्जरी विभागात दाखल करण्यात आले.     पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने मळमळ-उलट्यांसारखा त्रास होऊ लागला. वैद्यकीय भाषेत याला ‘रॅप्युन्झेल सिंड्रोम’ असे म्हणतात. या सिंड्रोममध्ये व्यक्ती स्वतःचे केस खाते आणि त्याचा मोठा पुंजका पोटात साठतो.     तिला सध्या द्रवरूप आहार सुरू असून, एंडोस्कोपी करून पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

हा दुर्मीळ पद्धतीचा सिंड्रोम आहे. यामध्ये काही वेळा मानसिक स्थिती ठीक नसल्याने रुग्ण केस काढून खात असतात. मात्र, काही वेळा मानसिक स्थिती ठीक असलेल्या रुग्णांमध्येसुद्धा हा आजार दिसून येत आहे. या रुग्णाची मानसिक स्थिती तपासण्यात येणार आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया करताना डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी, डॉ. हर्षल पडेकर आणि डॉ. सुप्रिया भोंडवे यांनी सहभाग घेतला.- डॉ. अजय भंडारवार, विभाग प्रमुख, जनरल सर्जरी विभाग, जे जे रुग्णालय.