चालण्याची सवय मोडली अन् गुडघे दुखी उद्भवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:59+5:302021-09-24T04:06:59+5:30

मुंबई : मागील काही दिवसांत सामान्यांचे चालणे कमी झाल्याने ऐन तरुण वयात गुडघा आणि कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे. तरुण ...

The habit of walking was broken and the knees became sore | चालण्याची सवय मोडली अन् गुडघे दुखी उद्भवली

चालण्याची सवय मोडली अन् गुडघे दुखी उद्भवली

Next

मुंबई : मागील काही दिवसांत सामान्यांचे चालणे कमी झाल्याने ऐन तरुण वयात गुडघा आणि कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे. तरुण वयातील कंबर आणि गुडघा दुखीच्या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित औषधोपचार तसेच व्यायाम व योग्य आहार घेणे आवश्यक असून, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याखेरीज छोट्या छोट्या कामांसाठी वाहनाचा वापर न करता चालण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणे गरजेचे आहे. रोजच्या व्यायामामध्ये चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे फार ताण येत नाही. यासाठी किमान साधने आवश्यक असतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो. सक्षम आरोग्याचे लाभ मिळावेत यासाठी तीस मिनिटे जोरजोरात हात हलवत चालण्याचा प्रयत्न करायला हवा. चालल्याने तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. हाडे बळकट होतात. अतिरिक्त चरबी कमी होते आणि तुमच्या स्नायूंमधील ताकद वाढते. हृदयविकार, दुसऱ्या प्रकारातील डायबेटिस, ऑस्टिओपोरोसिस आणि काही कर्करोग होण्याची शक्यता चालण्यामुळे कमी होते, अशी माहिती अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. गौरांग जैन यांनी दिली आहे.

चालण्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम

- हृदय आणि फुप्फुसांचे आरोग्य सुधारते.

- हृदयविकार आणि स्ट्रोक्सची शक्यता कमी होते.

- उच्च रक्तदाब, कोलेस्ट्राॅलची वाढलेली पातळी, सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना, काठीण्य आणि मधुमेह यांचे सुधारित व्यवस्थापन.

- हाडे मजबूत होतात.

- स्नायूंची ताकद आणि क्षमता वाढते.

- शरीरातील चरबी कमी होते.

- मानसिक आरोग्य सुधारते.

दररोज ३० मिनिटे चाला

- चालण्याआधी थोडे ‘वॉर्म अप’चे व्यायाम करून मग चालायला सुरुवात करावी.

- आधी थोडा वेळ सावकाश चालावे, मग हळूहळू वेग वाढवावा. पंधरा मिनिटे भरभर चालून पुन्हा चालण्याचा वेग कमी करावा, त्यानंतर पुन्हा हळूहळू वेग वाढवावा. यामुळे पाय, गुडघे आणि हृदय यांच्यावर ताण कमी येतो.

- शक्यतो अनवाणी चालू नये. चपला किंवा सँडल घालूनही पूर्ण पायाला आधार मिळत नाही. त्यामुळे मऊ सोलचे आणि पायांच्या बोटांकडे घट्ट नसलेले बूट घालणे चांगले.

- सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला चालले तरी चालेल. पण, सकाळी स्वच्छ हवा आणि व्हिटॅमिन डी-३ देणारा कोवळा सूर्यप्रकाश असल्याने सकाळी चालणे केव्हाही उत्तम.

- ज्यांचे नेहमी गुडघे दुखतात किंवा पाठीच्या हाडाची शस्त्रक्रिया होऊन गेली आहे, अशांनी भरभर चालणे अपेक्षित नाही. या व्यक्तींना चालण्याचा व्यायाम करायचा असेल, तर त्यांना सातत्याने सावकाश चालता येईल.

- शस्त्रक्रियेनंतर लगेच चालण्याच्या व्यायामाचा आटापिटा नको.

- गुडघे, हाडे किंवा सांधे प्रचंड दुखत असताना मुद्दाम चालू नका. दुखण्याची तीव्रता कमी होईपर्यंत विश्रांती घेऊन मगच चालणे सुरू करावे.

या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ चालतात.

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत.

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली.

तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत.

Web Title: The habit of walking was broken and the knees became sore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.