Join us

'बाळासाहेब असते तर अब्दुल सत्तारांसह मुख्यमंत्र्यांचीही जीभ हासडून टाकली असती'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 3:52 PM

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबई - शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी यांचेही भाषणं सध्या चांगलीच चर्चेत आहेत. प्रक्षोभक भाषणं करत असल्याने त्यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी करण्यात आली. शरद कोळी हे शिंदे गटातील नेत्यांवर प्रखर शब्दात टीका करत आहेत. आता, अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शरद कोळी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तसेच, जर बाळासाहेब असेत तर यांची जीभ हासडून हातात दिली असती, अशा प्रखर शब्दात त्यांनी टिकाही केली.  

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मंत्री सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरेही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. त्यातच, आता युवासेनेचे नेते शरद कोळी यांनीही शिंदे गटातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर प्रखर शब्दात टीका केली. 

खरंतर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, माँ रमाई, भिमाई, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी हा महाराष्ट्र. आज महाराष्ट्रातील माता-भगिनी या माऊलींचा विचार पुढे नेत आहेत. मात्र, या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं जन्माला आली हे दुर्दैव. आम्ही हिंदुत्त्वासाठी सत्ता स्थापन केली, हिंदुत्त्वासाठी गुवाहटीला गेलो असं मुख्यमंत्री छातीठोकपणे बाळासाहेबांचं नाव घेऊन सांगतात. मग, खरंच हिंदुत्त्वासाठी आपण सत्तेत बसला असाल, तर तात्काळ अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी युवासेनेचे नेते शरद कोळी यांनी केली आहे. 

राज्यात आज बाळासाहेब असते तर अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटलांसह तुमचीही जीभ हासडून टाकली असती, मंत्रीमंडळातून तुमची हकालपट्टी केली असती, असे म्हणत कोळी यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. कायदाव सुव्यवस्था फक्त विरोधी पक्षनेत्यांनाच आहे का, आज ह्यांनी बोललं त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यावर कारवाई करायला तुमचे हातपाय थरथरत आहेत का,  आता कुठं गेला कायदा, कुठे गेला कानून, कुठे गेलं तुमचं हिंदुत्त्व, असा सवालही कोळी यांनी विचारला आहे. 

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत 

टॅग्स :अब्दुल सत्तारबाळासाहेब ठाकरेएकनाथ शिंदे