'सुनील गावस्कर नसता, तर कदाचित म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:38 PM2021-09-16T12:38:20+5:302021-09-16T12:38:38+5:30
आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले
मुंबई - भारतात क्रिकेट हा जवळपास सगळ्यांच्या आवडीचा खेळ. देशात क्रिकेटला कौटुंबिक मान्यता आहे, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, घरातील बहुतांश सदस्य क्रिकेट सामन्यांचा सहकुटुंब-सहपरिवार आनंद घेताना आपण अनेकदा पाहिलंय. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच क्रिकेट पाहायला आवडते. टीम इंडियाचे सामने आवर्जून पाहिले जातात. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही क्रिकेट प्रेमाचा एक किस्सा ट्विटरवरुन शेअर केला आहे.
आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच, सुनील गावस्कर हे खेळाडू म्हणून महान होतेच, पण त्यांनी आतातरी क्रिकेट अकादमी सुरु करावी, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी व्यक्त केले आहे. आव्हाड यांनी ट्विट करुन जुन्या आठवणींना उजाळा देत या निर्णयाचाी माहितीही दिली.
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2021
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनील गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा, असे आव्हाड यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो, अशी आठवणही आव्हाड यांनी सांगितली.
भूखंड देण्याचा शासन निर्णय
शासन निर्णयानुसार या ठिकाणी इनडोअर क्रिकेट प्रशिक्षणाशिवाय हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशियम, जलतरण कक्ष, स्क्वॅश, प्रशिक्षणार्थ्यांची निवास व्यवस्था, स्पोर्ट्स कॅफेटेरिया यासह बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांच्या सुविधा त्याचप्रमाणे, खेळाडूंवर उपचार करण्यासाठी स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर, ऑडिटोरियम अशा विविध व्यवस्था उभारण्यात येणार आहेत. ‘म्हाडा’च्या अटीनुसार या जागेवर वर्षभराच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करायची असून, तीन वर्षांत बांधकाम पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम शासनाकडे नियमित जमा करावी लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनची मागणी
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या गावसकर क्रिकेट फाउंडेशनला क्रीडासंकुल उभारण्यासाठी मुंबईत दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. बांद्रा-कुर्ला संकुल परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळाच्या मालकीचा (म्हाडा) असलेला हा भूखंड ‘मल्टिफॅसिलिटीज स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर ॲण्ड आऊटडोअर फॅसिलिटीज’ या नावाने सोपविण्यात आला.
सुनील गावस्कर यांनी निवृत्तीनंतरही क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले आहे. त्यातच, सुनील गावस्कर फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारकडे यावर्षी २७ जानेवारीला वांद्रे-कुर्ला संकुल येथे इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी भुखंड मागितला होता. या दोन हजार चौ. मी. भुखंडाला आज मान्यता देण्यात आली आहे.
या इनडोअर सेंटरमध्ये काय असेल, जाणून घ्या...
या भुखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा, स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्कॉश या खेळासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षण केंद्रामध्ये बॅडमिंटन, फुटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना दुखापत झाली असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी मेडिसीन सेंटरही बांधण्यात येणार आहे.