Join us

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर

By मुकेश चव्हाण | Published: January 17, 2021 11:53 AM

मंत्री धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सांगितले

मुंबई/ चिपळूण : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणाचा धुरळा अजून उडतोच आहे. त्यात आज भाजपने भर घातली.  धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे प्रकरणी भाजपाने त्यांनी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,' असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेत्यांसह, महाविकास आघाडीच्या काही नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यात सत्तेतील सहकारी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंडे प्रकरणात घरचा अहेर दिला आहे. धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं विधान माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे. कोकणात चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांनी हे वक्तव्य केले आहे.

तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असं सांगितलं.  कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी रेणू शर्मावर केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. 

एका आठवड्यात चौकशी करा – गृहमंत्री

शुक्रवारी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक, ज्योत्स्ना  रासम यांची बैठक घेतली,यात एका आठवड्यात धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी असं मत गृहमंत्र्यांनी मांडलं. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

या प्रकरणावर काय म्हणाले शरद पवार?

आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी सांगितले.

तक्रारदार महिलेने काय केले आरोप?

'२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेनं केला आहे.

धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले-

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसहुसेन दलवाईभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार