होते नव्हते सारे गेले!
By admin | Published: December 8, 2015 01:11 AM2015-12-08T01:11:55+5:302015-12-08T01:11:55+5:30
दाटीवाटीने वसलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीवर सोमवारी काळ आणि वेळही एकत्र आली. येथे एका गोदामाला लागलेल्या आगीने झोपडपट्टीला कवेत घेतले आणि तब्बल दोन हजारांहून
मुंबई : दाटीवाटीने वसलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीवर सोमवारी काळ आणि वेळही एकत्र आली. येथे एका गोदामाला लागलेल्या आगीने झोपडपट्टीला कवेत घेतले आणि तब्बल दोन हजारांहून अधिक झोपडीधारकांचे संंसार उद्ध्वस्त झाले. येथे लागलेल्या आगीने झोपडीधारकांचे होते नव्हते ते सारे संपले आहे. आता आगपीडितांना उद्याची भ्रांत पडली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने घटनास्थळी त्वरित मदत पोहोचवली आहे. परिणामी आगग्रस्तांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
दामूनगरला लागलेली आग पाहताच स्थानिकांना मोठा धक्का बसला. एका गोदामाला लागलेल्या आगीने सगळ्याच झोपड्यांना कवेत घेतले. स्थानिकांनी सुरुवातीला वस्ती रिकामी करण्यास सुरुवात केली. अबालवृद्धांना सोबत घेऊन स्थानिकांनी वस्तीबाहेर धाव घेतली. तोवर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. दाटीवाटीची वस्ती असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आव्हान उभे राहिले होते.
स्थानिकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही मदतकार्याला हातभार लावला. पण रौद्र आगीसमोर
सर्वच हतबल झाले. तोवर दाटीवाटीच्या वस्तीमधून हातात मिळेल, ते साहित्य घेऊन जीव वाचविण्यासाठी स्थानिकांची पळापळ सुरू होती. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या सायरनच्या आवाजाने वातावरण धीरगंभीर झाले होते. (प्रतिनिधी)
दामूनगर येथे लागलेल्या भीषण आगीत हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आगीने दामूनगरला असे काही घेरले की, राहती वस्ती स्मशानभूमी बनली. येथील लोकांना आत्मबळ देण्यासाठी आता लोखंडवाला टाऊनशिप सिटीझन फोरम (लोटो)ने मदतीचा हात पुढे केला. लोटोने घटनास्थळी दाखल होत स्थानिकांना आगीतून बाहेर काढण्याचे काम केले. शिवाय गरज लक्षात घेता जवळच असलेल्या पालिकेच्या मैदानाची परवानगी मिळवली. स्थानिकांना मैदानात स्थलांतरित केले. दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरते तंबू, मंडप बांधण्यात आले. तसेच महिला आणि मुलांना आवश्यक कपडे देण्यात आले. शिवाय जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र अजूनही मदतीची आवश्यकता असल्याने मुंबईकरांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
मदतीसाठी इच्छुकांनी पैसे देऊ केले. परंतु संबंधितांना आर्थिक मदत नको, तर पाठबळ पाहिजे आहे. तेव्हा पैशांची मदत करू नका. संस्थेशी संपर्क साधून आवश्यक साहित्याची माहिती घ्या. शक्य असल्यास त्या साहित्याची मदत करा.
- विदुला कन्याल, लोखंडवाला टाऊनशिप सिटीझन फोरम (लोटो)
काबाडकष्ट करून उभा केलेला संसार आगीत
जळून खाक होताना पाहून दुर्घटनाग्रस्त खचले होते. तब्बल तीन तासांहून अधिक काळ ही आग धुमसत असतानाच सामाजिक सेवाभावी संस्था व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घेतलेली धाव काहीशी कामी आली आणि आगीत जळून खाक झालेल्या संसारांना सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले. महिंद्राचीही मदत
दामूनगरला लागलेल्या आगीदरम्यान महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली. महिंद्राने तब्बल २५ पाण्याच्या टँकर्सचा पुरवठा केला.
घरासाठी लढा : दामूनगर परिसर हा वन विभागात येतो. त्यामुळे येथील स्थानिकांचा कित्येक वर्षांपासून घरासाठीचा लढा सुरू आहे. त्यातील बहुतांश नागरिकांना पवईमधील संघर्षनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. वनविभागाची जागा असल्याने डोंगर भागात जवळपास दोन हजार झोपड्या उभारून लोक येथे राहत आहेत.
हातावर पोट भरणारे
दामूनगर परिसरात राहणारी वस्ती ही हातावर पोट भरणारी आहे. मोलमजुरी करणारा हा कामगार वर्ग कामानिमित्त बाहेर पडला होता. शिवाय विद्यार्थीवर्गही शाळेत गेला होता. येथे लागलेली आग डोंगरमाथ्याहून खाली पसरल्याने स्थानिकांना सुरक्षितरीत्या आपला जीव वाचविता आला.
परवानग्यांची वाट
पाहू नका - आयुक्त
दामूनगर परिसरातील आगीच्या घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी पालिकेच्या परिमंडळ ७ चे उपायुक्त अशोक खैरे व आर/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांना संबंधित परिसरातील नागरिकांना निवारा सुविधेसह आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवारा, पाणी इत्यादी सेवा-सुविधांसह इतर सर्व नागरी सेवा-सुविधा अत्यंत तातडीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी प्रशासकीय परवानग्यांची वाट पाहू नये, असेही आदेश आयुक्तांनी दिले.
...तर झोपड्या
जळाल्या नसत्याकच्चा व पक्क्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. एकानंतर अनेक अशा झोपड्यांना आग लागत गेली व पसरलेल्या आगीने दामूनगरला कवेत घेतले. येथील झोपडीधारकांना पक्की घरे बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही महापालिकेकडे केली होती. परंतु, महापालिकेने परवानगी दिली नाही. महापालिकेने जर परवानगी दिली असती तर आगीच्या दुर्घटनेत एवढ्या झोपड्या जळून खाक झाल्या नसत्या.
- प्रवीण दरेकर,
स्थानिक आमदार
घटनाक्रम
दुपारी १२.४५ वाजता आगीची पहिली माहिती मिळाली
दोन क्रमांकाची वर्दी
असलेली आग अग्निशमन
दलाने सायंकाळी ४.२५
वाजता आटोक्यात आणली
दुर्घटनेत सुमारे
२ हजार कच्च्या व पक्क्या झोपड्या खाक झाल्या
आग विझविण्यासाठी १६ फायर इंजीन, ७ पाण्याचे टँकर
१ आपत्कालीन
वैद्यकीय उपचार वाहन, १०८ आणीबाणी रुग्णवाहिका सेवा
एकूण २० रुग्णवाहिका, २ खासगी रुग्णवाहिकांची मदत
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडीही घटनास्थळी पोहोचली
कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाचे आपत्कालीन मदतकार्याचे प्रशिक्षण
प्राप्त २० ते २५ विद्यार्थी
त्वरित मदतकार्याकरिता घटनास्थळी दाखल.
आगीची झळ पोहोचलेल्या रहिवाशांची तात्पुरता निवारा म्हणून समतानगर भागातील हनुमान नगर, आकुर्ली मार्ग महापालिका शाळेत व्यवस्था.
बाधितांना खाण्याचे पदार्थ आणि पिण्याचे पाणी यांची व्यवस्थादेखील महापालिका प्रशासनाने स्थानिक अशासकीय संस्था तसेच विभागीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली.