"पवारांना माहिती असते तर सरकार दाेन दिवसांत पडले नसते"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:20 AM2023-02-15T08:20:37+5:302023-02-15T08:21:01+5:30
पहाटेच्या शपथविधीने राज्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहाटे झालेला तो शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनेच झाला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे.
पवारांचा हात असता तर पहाटेचे सरकार दोन दिवसांत पडले नसते, असे सांगत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला तर जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर त्याचा एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या, अशा शब्दात भाजपच्या मिशन महाविजयचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय यांनी विरोधकांना चुचकारले आहे. नागपुरात चव्हाण म्हणाले की, ही सर्व प्रक्रिया मी जवळून पाहत होतो. शरद पवार यांनी आमदारांना फोन करून परत बोलावले. ताकीद दिली. ही आपली भूमिका नाही, असे सांगितले.
फडणवीसांनी ऑफ नव्हे, इन कॅमेरा बोलावं : सुप्रिया सुळे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चित्रफीत पाहिली असता, त्यात त्यांनी हे मी ऑफ कॅमेरा सांगतोय, असे म्हटले आहे, परंतु फडणवीस यांनी ‘ऑफ कॅमेरा’ बोलण्यापेक्षा ‘ऑन कॅमेरा’ जे काही असेल, ते सत्य बोलावे आणि राज्याला खरी काय ती परिस्थिती सांगावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुसंस्कृतपणा आणि विकासात्मक चेहरा म्हणून आम्ही पाहत होतो, परंतु अलीकडच्या काळात त्यांची प्रतिमा पूर्णतः बदलली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस सत्यच बोलले
पवार यांच्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे. ते खोटे बोलून कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून मोठे झाले नाहीत. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
सत्य फडणवीस सांगू शकणार नाहीत
पहाटेच्या शपथविधीचे सत्य आणि रहस्य देवेंद्र फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत. यामागे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविणे, हे एक कारण नक्कीच आहे. केंद्रातून भाजपाचे प्रमुख लोक शरद पवार यांच्या सतत संपर्कात होते. - संजय राऊत
एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या : श्रीकांत भारतीय
महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेचा विश्वास पवारांवर आहे की फडणवीसांच्या शब्दांवर आहे, याबाबत एकदा सर्व्हे होऊनच जाऊ द्या, कळेल की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे, असे आव्हान भाजपच्या मिशन महाविजयचे संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांनी सोलापूर येथे बोलताना दिले. पवारांवर त्यांच्या घरातील लोकांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली.