Join us

'हाफिज सईदची अटक म्हणजे पाकिस्तानी नाटकाचा तिसरा प्रयोग' 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 7:26 AM

हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे.

मुंबई - पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला आहे. ही आणखी एक धूळफेक आहे की नाही हे हाफिजविरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिली आहे.

मुंबईवरील ‘26/11’ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ आहे. हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. असं शिवसेनेने सांगितले. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे  

  • मागील काही काळापासून हिंदुस्थानने हाफिज सईदसंदर्भात जागतिक पातळीवरून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. हाफिज याला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठीही प्रचंड प्रयत्न केले होते. 
  • अमेरिका, इंग्लंडसह सर्व बडय़ा देशांनीही त्याला समर्थन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे चिनी माकडांचेच मांजर आडवे गेले होते. अखेर चीननेही विरोध सोडून दिल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले. 
  • पाकिस्तानने त्याची सर्व मालमत्ता जप्त केल्याचा आणि त्याच्यावर निर्बंध लादल्याचा आव आणला होता. फेब्रुवारी महिन्यातही त्याची ‘जमात-उद-दवा’ ही दहशतवादी संघटना आणि तिला रसद पुरविणारी ‘फलाह-ए-इन्सानियत’ अशा दोन्ही संघटनांवर पाकिस्तानात बंदी घातली गेली. 
  • अर्थात हाफिज सईदविरोधात अशा कारवायांचे नाटक पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा केले आहे. पाकिस्तानात सत्ताधारी अथवा लष्करशहा कोणीही असला तरी हाफिज सईद, त्याच्या दहशतवादी संघटना आणि त्यामार्फत हिंदुस्थानवर होणारे जिहादी हल्ले याबाबतीत पाकिस्तानचे धोरण हाफिजच्या पारडय़ात वजन टाकणारेच राहिले आहे. 
  • हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे. त्यामुळे कोणत्याही पाकडय़ा पंतप्रधानाने हाफिजवर कडक कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत केलेले नाही.
  • विद्यमान पंतप्रधान इम्रान ते दाखवून आधीच गोत्यात असलेला आपला पाय आणखी खोलात घालतील याची शक्यता नाही. यापूर्वीही हाफिजला स्थानबद्ध केल्याचे नाटक पाकड्यांनी केले होतेच, पण दोन्ही वेळेस त्याची मुक्तता करण्यात आली. किंबहुना, या स्थानबद्धतेच्या काळात त्याची ज्या पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली त्यावरूनही पाकिस्तानचे नाटक स्पष्ट झाले होते. 
  • त्यामुळे आता त्याला पुन्हा अटक झाली म्हणजे तो त्याच्या दहशतवादी संघटना आणि कारवाया संपल्या असे होणार नाही. त्याच्या या अटकेला हिंदुस्थानने त्याच्या आणि पाकिस्तानी दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर निर्माण केलेला प्रचंड दबाव नक्कीच कारणीभूत आहे, 
  • इम्रान खानचे सरकार उद्या कोर्टात त्याच्याविरुद्ध सज्जड पुराव्यांची जंत्री सादर करेल, हाफिजच्या हातापायात साखळदंड पडतील, त्याला कोलू ओढावा लागेल आणि पाकिस्तानी न्यायालय मुंबई हल्ल्यातील निरपराध बळींसाठी अश्रू ढाळत त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावेल असे समजण्याचे कारण नाही. 
  • मुळात हाफिज सईदला ही अटक मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादी कारवायांना रसद पुरविल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यासंदर्भात झाली आहे. त्यामागे ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटनेचा दबाव कारणीभूत आहे. 
  • शिवाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे आणि दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. दुसरीकडे त्यावरूनच ‘फायनान्शियल टास्क फोर्स’कडून ‘काळय़ा यादी’त टाकले जाण्याची भीतीही पाकिस्तानला सतावते आहे. 
  • पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? 
टॅग्स :शिवसेनाहाफीज सईदपाकिस्तान