मुंबईत गारठा वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:40 AM2017-12-09T05:40:52+5:302017-12-09T05:41:00+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाचा विपरित परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले.
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाचा विपरित परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. तापमान खाली घसरल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील गारठा वाढला असून, येथील वातावरण आल्हादायक झाले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलाबा वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, २०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. सांताक्रुझ वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७.५, १८.६ नोंदविण्यात आले आहे. ‘ओखी’च्या तडाख्याने पडलेला पाऊस व त्यानंतर वातावरणात आलेला गारवा, या प्रमुख दोन घटकांमुळे मुंबईतला गारठा वाढला आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.