मुंबई : नोव्हेंबर महिना जसा जसा पुढे सरकत आहे तस तसे थंडी आणखी वाढत आहे. दिवाळीच्या तोंडावर गारठयात आणखी भर पडली असून, मुंबई, पुण्यासह नाशिकही गारठले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. मुंबईत अद्याप म्हणाव्या तशा थंडीचा शिरकाव झाला नसला तरी पहाटेच्या गारव्या मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मोठया प्रमाणावर गारठला आहे. पुण्यासह नाशकता तर थंडीने कहर केला असून, गेल्या ४ दिवसांपासून पुणे आणि नाशिकचे किमान तापमान सातत्याने १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तर मुंबईचे किमान तापमान २२ ते १९ अंश नोंदविण्यात येत असून, येथे मध्यरात्री वाहणा-या वा-याने गारठयात आणखी भर पडणार आहे. सांगली, नांदेड, उस्मानाबाद, मालेगाव, सातारा, बारामती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले असून, उत्तरोत्तर यात आणखी भर पडणार आहे.
------------------------
यंदा छोटा आणि कडक हिवाळा असेल. मराठवाड्यात यंदा थंडी मागील वर्षीपेक्षा जास्त असेल हे यंदा वैशिष्टय़पूर्ण असेल; कारण पाऊस जास्त झाला आहे. जमिनीत पाण्याचा अंश जास्त आहे हे शास्त्रीय कारण त्या मागे आहे. वेगाने तापमानात घसरण दिसून येईल. महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर आणि पानांवर गोठलेले दवबिंदू दिसून येऊ शकेल. महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी विदर्भ, नंतर मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात जास्त घसरण होते आहे.
- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ