लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात चटके देणारे ऊन पडत असतानाच वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त विदर्भात गारपीट होईल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत सातत्याने किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. किमान तापमानाचा सरासरी पारा २२ च्या आसपास नोंदविण्यात येत असून, कमाल तापमानाने तर कहर केला आहे. मुंबईसह कोकणातील कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविण्यात येत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे ऊन तापदायक ठरत आहे. वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. दुसरीकडे विदर्भातील कमाल तापमान ३९ अंश असून, हवामानातील बदलामुळे येथे गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.