हेअर स्पा पडला महागात; सलूनला सव्वा लाखांचा भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:58 AM2018-12-24T06:58:25+5:302018-12-24T06:58:41+5:30
हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या मानेवर व कानात गरम पाणी पडल्याने तिला झालेल्या जखमांचा भुर्दंड आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या होम सलून प्रा. लि. ला भरावा लागला.
मुंबई : हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या मानेवर व कानात गरम पाणी पडल्याने तिला झालेल्या जखमांचा भुर्दंड आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या होम सलून प्रा. लि. ला भरावा लागला. संबंधित महिलेला शारीरिक, मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये, तसेच उपचारासाठी वीस हजार, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून दहा हजार रुपये असे एकूण १,३०,००० रुपये देण्याचा आदेश नुकताच दिला.
हा आदेश अतिरिक्त मुंबई उपनगरीय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने संबंधित सलूनला दिला. पवईत राहणाऱ्या येरा शहा यांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला जायचे होते. त्या आधी त्यांनी हेअर स्पा, अन्य सौंदर्योपचारासाठी सलूनची निवडण्यासाठी आॅनलाइन शोधाशोध केली. त्यात त्यांना होम सलून प्रा. लि. हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सलून असल्याचे समजले. त्यांनी सलूनशी आॅनलाइन संपर्क साधला. दोघांत ठरल्यानुसार २७ डिसेंबर, २०१२ रोजी एक महिला कर्मचारी त्यांच्या घरी आली. तिने येरा यांचा हेअर स्पा करण्यास सुरुवात केली. त्यांचे केस धुताना महिलेने त्यांच्या मानेवर व कानात गरम पाणी ओतले. त्यामुळे त्यांचा मान व कान भाजला. जबर लागल्याने त्यांना दुबईचा दौरा रद्द करावा लागला. सलूनवाल्यांना याबाबत माहिती देऊनही त्यांनी त्याची दखल न घेतल्याने, येरा यांनी शहा यांनी ग्राहक मंचात तक्रार केली होती.
ूएकतर्फी आदेश
होम सलून प्रा. लि.च्या वतीने ग्राहक मंचात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मंचाने एकतर्फी आदेश दिला. महिला कर्मचाºयामुळे येरा यांना दुबई दौरा रद्द करावा लागला. मानसिक व शारीरिक त्रास झाला. सदर सलून चालकांनी सेवेत कसूर केल्याने ग्राहक मंचाने होम सलूनला येरा यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी एक लाख, उपचारासाठी वीस हजार, तक्रारीचा खर्च म्हणून दहा हजार रुपये, अशी १,३०,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.