हज यात्रा महागली : हज व उमराह यात्रेकरूंच्या खर्चात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:19 AM2018-05-07T07:19:49+5:302018-05-07T07:19:49+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द झालेले हज यात्रेचे अनुदान, जीएसटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत वाढलेला ३ टक्के कराचा भार व सौदी अरेबिया सरकारने लावलेला ५ टक्के व्हॅट या कारणांमुळे हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव दराने प्रवास करावा लागणार आहे.
- खलील गिरकर
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द झालेले हज यात्रेचे अनुदान, जीएसटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत वाढलेला ३ टक्के कराचा भार व सौदी अरेबिया सरकारने लावलेला ५ टक्के व्हॅट या कारणांमुळे हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव दराने प्रवास करावा लागणार आहे. त्यातच, यापूर्वी हज किंवा उमराह केला असल्यास सौदी सरकारने २ हजार रियाल (भारतीय ३५ हजार रूपये) भरण्याची सक्ती केल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हज यात्रेसाठी जाणाºया भाविकांना गतवर्षी १५ टक्के कर भरावा लागत होता यंदा ते प्रमाण १८ टक्के झाल्याने ३ टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. सौदी अरेबिया सरकारने लावलेला ५ टक्के व्हॅटची त्यामध्ये भर पडली आहे. तसेच, सरकारने यंदापासून हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका हज यात्रेकरूंना बसणार आहे. सरकारने हज यात्रा स्वस्त झाल्याचा दावा केला तरी प्रत्यक्षात मात्र हज यात्रा महागली आहे.
गतवर्षी मुंबईतून सौदी अरेबियाला हजला जाणाºया अजिजीया गटातील प्रवाशाला १ लाख ९७ हजार रूपये द्यावे लागत होते. यंदा त्यामध्ये सुमारे १० हजारांची वाढ झाली असून प्रवाशाला २ लाख ६ हजार रूपये द्यावे लागणार आहेत. तर ग्रीन गटातील प्रवाशाला गतवर्षीच्या २ लाख १५ हजार रूपये द्यावे लागले होते त्यांना यंदा २ लाख ४० हजार रूपये द्यावे लागतील. ही वाढ २५ हजार रूपयांची आहे. यंदा देशातून पावणे दोन लाख भाविक हज यात्रेला जाणार आहेत. गतवर्षी सव्वा लाख भाविक गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने हज यात्रेचे अनुदान २०२२ पर्यंत टप्प्याटप्याने समाप्त करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, केंद्र सरकारने २०१८ मध्येच हे अनुदान समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ मध्ये जगभरातून सौदी अरेबियाला हज साठी ८३ लाख नागरिक गेले होते.
हज व उमराह साठी जाणाºया भाविकांना वाढत्या दराचा आर्थिक फटका बसत असल्याने सौदी अरेबिया सरकारने या वाढलेल्या दरात कपात करून भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. राज्याचे माजी मंत्री व कॉंग्रेसचे आमदार आरिफ नसीम खान यांनी सौदी अरेबियाच्या दुतावासाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.
हज यात्रेला जाण्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम भाविक पै पै जमा करून आर्थिक तरतूद करत असतात. अशा नागरिकांचे सौदी सरकारच्या
या अन्याय दरवाढीमुळे कंबरडे मोडण्याची भीती निर्माण झाली आहे. सौदी अरेबिया सरकारने या वाढीव शुल्कात कपात करून हज व उमराहला जाणाºया भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खान यांनी केली आहे.
यंदा सौदी अरेबियातील सेवांमध्ये दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम हज यात्रेकरूंच्या बजेटवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत विमान प्रवासाच्या दरात कपात झाली आहे, मात्र अनुदान बंद झाल्याने औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्याचा भार प्रवाशावर पडला आहे.
- डॉ मक्सूद अहमद खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय हज समिती