मुंबई : हाजी अली दर्ग्यातील मजारमध्ये जाण्यास महिलांना केलेल्या बंदीचा वाद सामोपचाराने सोडवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते व दर्गा ट्रस्टला शुक्रवारी केली.डॉ. नूरजहा साफीया नियाज व झाकीया सोमन यांनी या बंदीविरोधात याचिका केली आहे. या दर्ग्यात मजारमध्ये जाण्यास महिलांना बंदी घालण्यात आली आहे. हे गैर असून राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाऱ्यांचा याने भंग होत आहे. मुंबईतील माहिम दर्ग्यासह इतर कोणत्याही दर्ग्यात मजारपर्यंत जाण्यास महिलांना बंदी नाही. तेव्हा हाजी अलीमध्ये करण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.या बंदीपेक्षा मजारमध्ये जाण्यासाठी ड्रेस कोड सारख्या पर्यांयाचा दर्गा ट्रस्टने विचार करायला हवा, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने वरील सूचना करत ही सुनावणी तहकूब केली.
हाजी अलीचा वाद सामोपचाराने सोडवा -हायकोर्ट
By admin | Published: July 11, 2015 11:40 PM